क्रांती म्हणजे बदल. रूपात्मक आणि गुणात्मक बदल जेव्हा होतो तेव्हा क्रांती झाली असे म्हटले जाते. माणसात झालेली क्रांती म्हणजे त्याच्या बाह्य आणि अंतरंगात म्हणजेच शारीरिक आणि बौद्धिक बदल म्हणजे क्रांती. शारीरिक क्रांती म्हणजे रंग बदलणे किंवा अवयव बदलणे आणि आंतरिक किंवा बौद्धिक क्रांती याचा अर्थ माणसाचे मन आणि बुद्धी म्हणजे विचार बदलणे यास मानवी क्रांती किंवा माणसात झालेला बदल असे म्हणतात. त्याचप्रमाणे भौतिक क्रांती म्हणजे आर्थिक आणि सामाजिक बदल होय. तसेच व्यवस्था बदलणे म्हणजे क्रांती होय. समतेची व्यवस्था आणि समतेचे विचार किंवा आधी समतेचे विचार आणि नंतर समतेची व्यवस्था अशी अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा क्रांती झाली असे म्हणावे लागेल, अर्थात विषमतेची व्यवस्था आणि अशा व्यवस्थेतील जनतेचे विषमतेचे विचार अशी अवस्था जेव्हा असते तेव्हा प्रतीक्रांती असे म्हणावे लागेल. कारण आदिमानवाच्या वेळी आदिम व्यवस्था ही साम्यवादी होती, म्हणजेच समतावादी होती, अशी व्यवस्था दहा हजार वर्षांपूर्वी होती, समतेची व्यवस्था होती. म्हणजेच आर्थिक आणि सामाजिक समता इथे नांदत होती. परंतु या व्यवस्थेतील विषमतावादी विचाराच्या लोकांनी संघटित होऊन संघर्ष करून , हाती शस्त्र घेऊन, म्हणजेच हिंसेचा मार्ग धरून समतीविरुद्ध विषमतेची प्रतिक्रांती केली. तेव्हापासून आजपर्यंत साऱ्या जगात विषमतावादी अर्थव्यवस्था प्रचलित आहे.
” विश्वचि हे माझे घर “या ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारातील समता, समतेचे विचार, आणि समतेची व्यवस्था माणसाच्या आदिमा अवस्थेत होती ती आज नाही, म्हणून ‘सब भूमी गोपाल की, जय जगत, विश्वशांती, अहिंसा परम धर्म,’ असे हे समतेचे विचार आणि समतेची व्यवस्था चे पाठ राखण करणारे संत आणि महामानव आहेत. त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या मार्गानेच जाण्याची खरी गरज आहे, कारण त्यांचे विचार आणि त्यांचा मार्ग हा प्रत्येक माणसाला म्हणजे सर्वांनाच सुख शांती समाधान आणि आनंद देऊ शकतो. विषमतावादी विचार मांडणारे आणि त्यांच्या मार्गाने जाणारे लोक कधीच सुख शांतीच्या जगात राहणे शक्य नाही.
मग सुख शांतीच्या जगात जायला अडचणी कोणत्या आहेत ? याचा पण विचार करण्याची गरज आहे. त्यातील पहिली अडचण ही की, विषमतावादी विचाराचे लोक म्हणजेच विषमतावादी यांनी या जगात अनेक वर्ण, अनेक जाती, अनेक वर्ग निर्माण केले, म्हणजेच आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता निर्माण केली, विषमतावादी व्यवस्था निर्माण केली, यादी समतावादी व्यवस्था होती, परंतु स्वार्थी लोभी, आप मतलबी, दृष्ट अवगुणी काही मूठभर लोकांनी आपली सत्ता संपत्ती प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी प्रतिक्रांती केली आणि स्वतःचे वर्चस्व भेदभाव निर्माण केला, विषमतावादी व्यवस्था या जगावर लादली. हातात शस्त्र घेऊन म्हणजेच संस्थेच्या मार्गाने. या हिंसावादी दुष्ट अविवेकी लोकांपुढे अहिंसावादी विवेकी लोकांचा पराभव झाला, त्यामुळे आदिम साम्यवाद नाहीसा होऊन विषमतावादी व्यवस्था निर्माण झाली. वर्ण जाती आणि धर्म वर्ग हे विषमतावादी व्यवस्थेचे वैशिष्ट्य आणि स्वरूप होय, या व्यवस्थेचे म्हणजे अनेक जाती वर्ण अनेक धर्म आणि वर्ग यांचे दुष्परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागत आहेत मग यात श्रीमंत सुद्धा सुटत नाहीत. यामुळेच माणसाचे सुख शांती समाधान आनंद नष्ट झाले आहे. समतावादी म्हणजेच साम्यवादी अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था जर निर्माण झाली तर हे सारे वैभव परत माणसाला मिळू शकते. परंतु अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पक्ष यामुळे सारा गोंधळ निर्माण झालेला आहे, कोणाचाच पायपुस कुणाला नाही, सारे गुंतागुंत निर्माण झालेली आहे, हा गुंता काढणे म्हणावे तेवढे सोपे नाही तरीपण माणसाने जर दृढनिश्चय केला तर फार काही अवघड पण नाही, पण म्हणतात ना “इथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नव्हे ते “. तुकाराम महाराज म्हणतात, अशक्य ते शक्य करिता सायास तुका म्हणे, प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे,”पण यासाठी समतेच्या विचारा चा आधी स्वीकार आणि मग त्याचे जागरण, त्यानंतर संघटन आणि त्यानंतर संघर्ष ह्या क्रमाने प्रयत्न झाले तर प्रतिक्रांतीला उत्तर म्हणून क्रांती होणे फार अवघड नाही.
माणसांची गर्दी किंवा बाजार म्हणजे संघटीत समाज नव्हे, तर एका विचारांच्या लोकांचे संघटन म्हणजे संघटित समाज होय, क्रांतीसाठी गर्दीची गरज नसते तर दर्दी लोकांची गरज असते, संख्येची गरज नसते तर बहुसंख्येची गरज असते, ज्यास आपण लोकशाही म्हणतो, पण अशी लोकशाही की जी समतावादी विचारावर चालणारी, विषमतावादी विचारावर चालणारी लोकशाही ही नेहमीसाठी विषमतावादी व्यवस्थाच कायम ठेवत असते, आणि प्रतिक्रांती करणे हा तिचा धर्म म्हणजे कर्तव्य म्हणजे वैशिष्ट्य असते.
अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पक्ष ज्या देशात आहेत त्या देशात समतेचे विचार पेरणे आणि समतावादी विचाराचे लोक एकत्र येणे, संघटित होऊन संघर्ष करणे कठीण जाते. विषमतावादी व्यवस्था म्हणजे प्रतिक्रांती होय, समतावादी व्यवस्था आणणे म्हणजे क्रांती करणे होय, अशी क्रांती करायला जाती धर्म आणि पक्ष हे अडसर होत असतात. तरीपण अशाही अवस्थेत समतेचे विचार जगातील संत महात्मे महामानव परिवर्तनवादी क्रांतिकारक लोकांनी पेरण्याचे काम चालूच ठेवले आहे, त्यामुळे समतेचा सूर्य उगव उगवण्याची आशा दिसते. तरीही बहु जाती , बहु धर्म, बहु पक्ष, हे क्रांती अडसर होत असतील तर ‘ बहू ‘ चा हा विचार आपणास सोडून द्यावाच लागेल. आणि आर्थिक सामाजिक समतेच्या वाटेने जाण्यासाठी एकच विचाराचा म्हणजे समतेच्या विचाराचा मार्गाचा व्यवस्थेचाच मार्ग धरावा लागेल, तरच क्रांती शक्य आहे.
यासाठी समतावादी विचारांच्या लोकांनी एकत्र येणे, संघटित होणे, आणि संघर्ष करणे हे महत्त्वाचे आहे. परंतु यासाठी आपण आपली जात विसरली पाहिजे, सांप्रदायिक धर्म विसरला पाहिजे, आणि विषमतावादी पक्ष चा त्याग केला पाहिजे. तरच क्रांती होऊ शकेल, अन्यथा नाही.
यासाठी स्वतःचे अहंभाव, अहंकार, लोभ, सत्ता संपत्ती प्रतिष्ठा याची आकर्षण नष्ट केले पाहिजे,”सत्तेसाठी आणि पैशासाठी काहीपण हा हट्ट सोडला पाहिजे, आणि जरी नाही सोडला तरी परिवर्तन घडणारच आहे, परिवर्तनाच्या या चक्रात तुम्हाला तुमची सत्ता संपत्ती प्रतिष्ठा सोडावीच लागणार आहे, अशी परिस्थिती निर्माण होईल. म्हणून समतावादी विचारांचे लोक आणि पक्ष यांनी एकत्र यावे, ही वर्तमान काळाची गरज पण आहे.
जातीचा अहंकार, धर्माचा अभिमान, आणि पक्षाचा खूप कूपमंडुकपण, आणि पक्षप्रमुखाची हुकूमशाही नष्ट झाल्याशिवाय समतेची वाट सापडणार नाही म्हणजेच सुखाची संधी मिळणार नाही. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य मिळवायचे असेल तर समतेची विचार आणि समतेची व्यवस्था आणि त्यासाठी क्रांती करणे आवश्यक आहे.


