Home Social श्री गुरु हैबतबाबा पायरी पूजन सोहळा हरीनामाच्या गजरात साजरा….

श्री गुरु हैबतबाबा पायरी पूजन सोहळा हरीनामाच्या गजरात साजरा….

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळा कार्तिकी वारीत आज (दि.12) श्री गुरु हैबतबाबा यांच्या पायरी पूजन सोहळा भक्तिभावपूर्ण प्रारंभ झाला. पारंपरिक रितीरिवाजात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या परिवारातर्फे हे पूजन संपन्न झाले.

           ऋषिकेश आरफळकर व विश्वस्त मंडळ यांनी फुलांनी सजविलेल्या पायरीचे पूजन केले. दही, दूध, मध, तूप, साखर, अत्तर आणि पुष्पहार अर्पण करून महानैवेद्य दाखविण्यात आला. या वेळी वेदमूर्ती श्रीनिवास कुलकर्णी, अमोल गांधी यांनी पूजेचे पौरोहित्य केले. पूजनानंतर उपस्थित मान्यवरांना परंपरेनुसार नारळ प्रसाद देण्यात आला.

          यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, डॉ.भावार्थ देखणे, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, राजाभाऊ चोपदार, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, मंगेश आरु, राजाभाऊ चौधरी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस.नरके, मा.सभापती डि.डि.भोसले, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण,ॲड.विष्णू तापकीर, संकेत वाघमारे, विठ्ठल घुंडरे, संदीप नाईकरे, प्रसाद बोराटे तसेच वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

          दरम्यान, राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आणि भाविकांचे आळंदीकडे आगमन सुरू असून, हरिनाम गजरात संपूर्ण नगरी दुमदुमली आहे. श्री संत नामदेवराय महाराज, भक्त पुंडलिक आणि श्री पांडुरंग यांच्या पादुकांच्या वारी आळंदीत दाखल होणार आहेत.

        कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पहाटे घंटानाद, आरती, हरिपाठ आणि कीर्तनांनी धार्मिक वातावरण अधिकच भारावले. श्री गुरु हैबतबाबा यांच्या ओवरीत दिंडींची मंदिर प्रदक्षिणा, पूजा व आरती पार पडली. विश्वस्त मंडळांच्या उपस्थितीत पूजा विधी पार पडल्यानंतर आरफळकर यांच्या हस्ते नारळ प्रसाद देण्यात आला.

          यात्रेनिमित्त श्री ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून इंद्रायणी तीरावर तसेच आळंदीतील प्रमुख चौकात कीर्तन, प्रवचन, हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. आळंदी नगरी सध्या “माऊली माऊली”च्या घोषात न्हाऊन निघाली आहे.