दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – येत्या आळंदी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून शिरीष कारेकर रणांगणात उतरण्याची तयारी करत असून, स्थानिक स्तरावर ते एक सक्रिय समाजसेवक, स्वच्छ चारित्र्याचे आणि प्रामाणिक सेवानिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी ‘इंद्रायणी सेवा फाउंडेशन’ व इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून आळंदीकरांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
कारेकर यांनी इंद्रायणी सेवा फौंडेशन च्या माध्यमातून इंद्रायणी नदी संवर्धन उपक्रम, स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे आणि रक्तदान शिबिरे अशा अनेक सामाजिक कार्यांची मालिका सातत्याने राबवली आहे. पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती घडविण्याचे त्यांच्या संस्थेचे मोलाचे कार्य विशेष दखल घेण्यासारखे ठरले आहे.
प्रभाग क्रमांक ६ मधील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, प्रकाशयोजना आणि वाहतूक कोंडी हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. “वारकरी परंपरेचा सन्मान राखत आधुनिक सुविधा असलेला स्वच्छ, हरित आणि आदर्श प्रभाग उभारणे हे माझे उद्दिष्ट आहे,” असे कारेकर यांनी सांगितले.
स्थानिक तरुणाई व महिला गटांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव असून, सामाजिक बांधिलकी, पारदर्शक कामकाज आणि जनतेशी थेट संवाद यामुळे त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. स्वच्छ चारित्र्य, प्रामाणिकता आणि सेवानिष्ठ वृत्ती ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.
महिलांच्या स्वावलंबनासाठी, वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी आणि शिक्षणविकासासाठी विशेष उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे. आळंदीतील निवडणूक रंगतदार बनत असताना प्रभाग सहामध्ये शिरीष कारेकर यांच्या प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.



