दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी :- संत नगरी आळंदीतील आगामी नगरपरिषद निवडणुकीत समाजाभिमुख, तरुण आणि कार्यक्षम चेहरा म्हणून ओळख असलेले आळंदीचे माजी उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. प्रभाग क्रमांक १ मधून ते या निवडणुकीत उमेदवारी सादर करण्याच्या तयारीत असून, स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
“प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाणारा” असा विश्वासार्ह चेहरा म्हणून आदित्य घुंडरे यांनी गेल्या काही वर्षांत आळंदीतील जनतेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजसेवा, स्वच्छता उपक्रम, रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक प्रकाशयोजना, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आणि वारकरी व भाविकांसाठीच्या सुविधांबाबत त्यांनी सतत पुढाकार घेतला आहे. स्थानिक तरुण वर्ग, महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात त्यांचा चांगला संपर्क असून, नागरिकांच्या छोट्या–मोठ्या अडचणींसाठी ते नेहमीच पुढे सरसावले आहेत.
आदित्य घुंडरे म्हणाले, “आळंदी ही संतांची भूमी आहे. विकासाच्या वाटचालीसोबतच या शहराचे अध्यात्मिक आणि सांस्कृतिक सौंदर्य जपणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. प्रभाग क्रमांक १ ला आदर्श आणि सर्वांगीण विकासाचा प्रभाग बनवणे, हेच माझे ध्येय आहे.” त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये विश्वास आणि आत्मीयता निर्माण झाली आहे.
समाजकारणासोबतच वारकरी सेवेतील त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. येत्या काही दिवसांत घुंडरे यांच्या प्रचार मोहिमेला वेग येणार असून, घराघरांत जाऊन संवाद साधण्यावर भर राहणार आहे. नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये आदित्य घुंडरे यांच्याकडे मतदारांचे लक्ष वेधले गेले असून, त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागात रंगत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.



