पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात आज मोठा उलथापालथ घडली आहे. भाजपचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शहर सरचिटणीस तसेच शिवसेनेचे शहराध्यक्ष यांनी काँग्रेसमध्ये जाहीरपणे प्रवेश करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
या तिन्ही नेत्यांनी आमदार विजयभाऊ वडेट्टीवार आणि आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसचा झेंडा हातात घेतला. हा पक्षप्रवेश सोहळा आज दुपारी ब्रम्हपुरी येथील कमलाई निवास येथे उत्साहात पार पडला. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी नवागतांचे स्वागत करताना सांगितले की, काँग्रेस ही विकास, सामाजिक समतेचा आणि जनतेच्या हिताची चळवळ आहे. आज अनुभवी आणि लोकाभिमुख नेते काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत, हे या पक्षाच्या वाढत्या जनाधाराचे द्योतक आहे.
महत्त्वाचे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये भाजपचे माजी नगराध्यक्ष श्याम उईके, राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे विधानसभा सरचिटणीस हंसराज लांडगे आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष विकास प्रधान, लुनकरण चौधरी, राधेश्याम पत्रे, आंबेडकरी चळवळीचे नेते साजन मेश्राम, पवन गेडाम, सहदेव पुराम यांचा समावेश आहे.
या नेत्यांनी गेल्या काही वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रिय भूमिका निभावली असून, नगरपरिषद व तालुका पातळीवर त्यांचा प्रभाव आहे व पुढील काळात अनेक कार्यकर्ते कांग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती यावेळी दिली.
काँग्रेसला मिळणार बळ देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठे बळ मिळणार आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढेल, तर दुसरीकडे भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेनेच्या गोटात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
आमदार रामदास मसराम यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले, जनतेच्या प्रश्नांवर लढणारा आणि विकासाला प्राधान्य देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस नव्या सहकाऱ्यांच्या सहभागामुळे देसाईगंज आणि परिसरात पक्ष आणखी मजबूत होईल.
यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. नव्या नेत्यांच्या प्रवेशाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस विजयाची पताका फडकवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



