दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
नागपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपूरच्या पोलिस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत,नागपूर येथील कस्तुरचंद पार्कमध्ये झालेल्या प्रार्थना महोत्सवात अंधश्रद्धा विरोधी कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही तक्रार 7 नोव्हेंबर 2025 रोजी दाखल करण्यात आली. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की,तीन दिवस चाललेल्या या प्रार्थना महोत्सवातील एका व्हिडिओमध्ये प्रार्थनेद्वारे सर्व आजार आणि समस्या बऱ्या होऊ शकतात,असा दावा करण्यात आला आहे.
समितीने सांगितले आहे की अशा प्रकारचे दावे करणे हे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरतो.तसेच समितीने स्पष्ट केले की,प्रार्थनेद्वारे आजार बरे होतात’ हे सिद्ध करणाऱ्यासाठी 21 लाख रुपयांचे आव्हान मागील 35 वर्षांपासून खुले आहे.
मात्र अद्याप कोणीही ते सिद्ध करू शकलेले नाही.कस्तुरचंद पार्क येथे ख्रिश्चन समुदायाच्या प्रार्थना महोत्सवादरम्यान झालेल्या या घटनेविषयी समितीच्या वतीने स्थानिक पोलिस आयुक्त आणि उपआयुक्तांना तक्रार व निवेदन देण्यात आले.
पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात तात्काळ कारवाईचे आश्वासन देऊन आवश्यक आदेशही जारी केले.समितीच्या म्हणण्यानुसार,तीन दिवसांच्या या उत्सवाचा व्हिडिओ एका YouTube चॅनेलवर पाहिला गेला,ज्यात प्रार्थनेद्वारे सर्व आजार,दुःख,अडचणी आणि समस्या दूर होतात,असा दावा करण्यात आला आहे.
समितीच्या मते हे विधान संविधानाच्या विरोधातील असून, जनतेची दिशाभूल करणारे आहे.त्यामुळे हा कार्यक्रम तात्काळ थांबवावा,तसेच अशा प्रकारे नागरिकांना फसवणाऱ्यांविरुद्ध अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा, 2013 अंतर्गत कारवाई करण्यात यावी,अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करता वेळी शिष्टमंडळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे,नागपूर जिल्हा सरचिटणीस डॉ.सुनील भगत,कार्यकारी अध्यक्ष चित्तरंजन चौरे,उत्तर नागपूर शाखा अध्यक्ष देवानंद बडगे,वैज्ञानिक जागृती प्रकल्प सचिव देवयानी भगत,दक्षिण नागपूर शाखा अध्यक्ष मंगला गाणार,तसेच निखिल बोरिये,धम्मरक्षित मुरमाडकर दाम्पत्य आणि अन्य मान्यवर सदस्य उपस्थित होते.



