दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्षांसह २१ नगरसेवकपदांसाठी अद्याप कोणत्याही पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत उमेदवार निश्चिती होऊन राजकीय धुळवडीला सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
राज्यात सत्तेत असलेली भाजप नगराध्यक्षपदासह सर्व २१ जागा स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपकडून तिकीट न मिळालेले काही इच्छुक शिवसेना (शिंदे गट) या पर्यायाचा विचार करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत आळंदीतील राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
सर्वांच्या नजरा सध्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून कोण उमेदवार दिला जाणार याकडे लागल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर उमेदवार ठरविताना नव्या चेहऱ्याला संधी मिळेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काही नाराज इच्छुक शिंदे गटाकडे झुकू शकतात, अशीही चर्चा सुरू आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) देखील नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करत असून, भाजपसोबत युती होणार की स्वतंत्र लढत देणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस या पक्षांकडून मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
या वेळी नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठीरेखीव आरक्षित असून, २१ नगरसेवक जागांपैकी अकरा जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे यंदा नगरपरिषदेवर महिलाराज येणार, अशी शक्यता व्यक्त होत आहे. प्रत्येक प्रभागातून पाच ते सहा इच्छुक पुढे येत असून, तिकीट कोणाला मिळणार व कोणाचा पत्ता कट होणार, याची उत्सुकता वाढली आहे.
नगराध्यक्षपद आपल्या पारड्यात पाडण्यासाठी भाजपकडूनश काही माजी पदाधिकारी पुन्हा संधी मिळविण्याच्या प्रयत्नात असून, तर काही नव्या चेहऱ्यांना पुढे करण्याची चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषद निवडणूक ही प्रतिष्ठेची आणि चुरशीची ठरणार आहे.
दरम्यान, काही राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपविरुद्ध सर्वपक्षीय आघाडी होण्याची शक्यता असून, या आघाडीमुळे निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत नगराध्यक्षपदासाठीची स्पर्धा अधिकच तीव्र होईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, नगराध्यक्षपदावरून भाजपमध्ये नाराजी निर्माण झाल्यास शिंदे गटाला त्याचा फायदा होऊ शकतो. राष्ट्रवादी अजित पवार गटाने महिलांवर केंद्रित प्रचार केला, तर भाजपसमोरील समीकरण अधिक गुंतागुंतीचे होऊ शकते.
दरम्यान, कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या राजकीय हालचालींमुळे आळंदी पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी आली आहे. उमेदवारी अर्ज प्रक्रियेच्या प्रारंभासह पुढील आठवडाभरात आळंदीतील राजकारणाचे तापमान आणखी वाढणार आहे.



