Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक : पारदर्शक कारभार आणि आदर्श प्रभागासाठी सोमनाथ कुऱ्हाडे रिंगणात…

आळंदी नगरपरिषद निवडणूक : पारदर्शक कारभार आणि आदर्श प्रभागासाठी सोमनाथ कुऱ्हाडे रिंगणात…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : वारकरी परंपरेने समृद्ध असलेल्या आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ कुऱ्हाडे यांनी प्रथमच आळंदी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मधून नगरसेवकपदासाठी रिंगणात उतरत आहे. विशेष म्हणजे, कुऱ्हाडे यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी केवळ जनसेवा आणि पारदर्शक कारभाराच्या बळावर नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा संकल्प केला आहे.

         गेल्या काही वर्षांपासून आळंदीत नागरी सुविधांचा असमतोल, वाहतुकीचा गोंधळ, अनियमित पाणीपुरवठा आणि वाढती लोकसंख्या यामुळे अनेक प्रश्न गंभीर स्वरूपात पुढे आले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीतील, राजकारणापासून दूर राहिलेला एक सामाजिक चेहरा निवडणुकीच्या मैदानात उतरणे हा नवा बदल मानला जात आहे. कुऱ्हाडे यांनी नगरपरिषदेसाठी “पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकसहभाग” या तीन तत्वांवर आधारित दृष्टीकोन मांडला आहे.

         “सत्ता मिळविणे हे उद्दिष्ट नाही, तर नागरिकांच्या विश्वासाला न्याय देणे हेच खरे ध्येय आहे,” असे ते सांगतात. आळंदीतील वाहतुकीचा प्रश्न पाणी प्रश्न हा त्यांच्या मते विकासाचा केंद्रबिंदू आहे. लग्नतिथी, यात्राकाळात तसेच दैनंदिन जीवनात होणारी कोंडी, अपुऱ्या पार्किंग निर्माण होणारा गोंधळ यावर त्यांनी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज व्यक्त केली आहे. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सुरक्षित व सुसज्ज वातावरण निर्माण करण्याची त्यांची भूमिका आहे. सुरक्षित, स्वच्छ आणि आदर्श प्रभाग उभारणे हीच खरी सेवा,” असा विचार सोमनाथ कुऱ्हाडे मांडतात.

         प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत, त्यांच्या समस्या थेट जाणून घेण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. त्यांच्या संवादशैलीत राजकारणापेक्षा प्रामाणिकपणा आणि विकासाची तळमळ अधिक जाणवते. नागरिकांकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता, पारदर्शक कारभाराच्या त्यांच्या संकल्पाला सकारात्मक दाद मिळत आहे. कुऱ्हाडे यांची ही उमेदवारी पारंपरिक राजकारणाला एक पर्यायी दिशा देणारी ठरू शकते.

         समाजसेवेच्या पायावर उभारलेली नेतृत्वशैली आणि प्रामाणिक प्रशासनावर आधारित कार्यपद्धती यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. आळंदीच्या राजकारणात या नव्या चेहऱ्याच्या प्रवेशामुळे एक वेगळा संवाद सुरू झाला आहे. – राजकारण हे फक्त सत्तेसाठी नसून, जनसेवेसाठीही असू शकते, याचा प्रत्यय देण्याची संधी सोमनाथ कुऱ्हाडे यांनी या निवडणुकीत साधली आहे.