Home Social अध्यात्मिक ऐक्याची सायकलवारी व रथयात्रेचे आळंदीत भव्य स्वागत…  — संत नामदेव...

अध्यात्मिक ऐक्याची सायकलवारी व रथयात्रेचे आळंदीत भव्य स्वागत…  — संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त भक्ती,सेवा व एकतेचा संदेश…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :- संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमाण (पंजाब) या सुमारे पाच हजार किलोमीटर लांब पल्ल्याच्या आणि ३१ दिवस चालणाऱ्या रथयात्रा व सायकलवारीचे स्वागत माऊलींच्या अलंकापुरी आळंदी येथे भाविकांच्या जल्लोषात करण्यात आले. श्री क्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने या सायकल वारीचे व रथयात्रेचे हरीनामाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

        भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी व समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव महाराजांची ७५५ वी जयंती, श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा आणि शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजींचा ५५६ वा प्रकाश पर्व या त्रिसंयोगानिमित्त ही वारी काढण्यात आली आहे. वारीचे हे चौथे वर्ष असून ती महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या आठ राज्यांतून प्रवास करणार आहे. या वारीत १५० सायकलस्वार व ५० भजनी मंडळी सहभागी झाली आहेत. देशातील ही पहिली अध्यात्मिक सायकलवारी असल्याचे भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे व ॲड.विलास काटे यांनी सांगितले.

       आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा यांच्या हस्ते माऊली मंदिरात संत नामदेव महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सायकलवीर वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डि.डि.भोसले-पाटील, प्रशांत कुऱ्हाडे, डॉ.मनोज राका, ज्ञानेश्वर वीर, अजित वडगांवकर, दिनेश घुले, संकेत वाघमारे, सागर भोसले, कालीदास तापकीर, डॉ.विकास पाटील, महेश कुऱ्हाडे, विठ्ठल घुंडरे, डॉ.सुनील वाघमारे, शंकर टेमगिरे, राजेंद्र कापसे, मनोज मांढरे, विठ्ठल शिंदे आदींसह वारकरी व आळंदीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांच्या जयघोषात संत नामदेव महाराजांच्या पादुका आळंदी माऊलींच्या नगरीत पोहोचताच वातावरण ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजराने दुमदुमले.