सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
जिल्हा परिषद निवडणुकीची लगबग सुरू असताना बोथली -कवठी जि. प.मधून रोहित बोम्मावार यांनी राजकीय रिंगणात उतरायची तयारी केली आहे. भाजप पक्षाशी एकनिष्ठ असलेले सावली तालुका महामंत्री सतीश बोम्मावार यांचे छोटे बंधू असलेले हे भारतीय जनता पक्ष कडून इच्छुक असून, स्थानिक राजकारणात नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून पुढे येत आहेत.
रोहित बोम्मावार हे ‘साथ’ प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सावलीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. शहरातील स्वच्छता, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत यासारख्या अनेक उपक्रमांमुळे त्यांनी नागरिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक कार्यातून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या या तरुण नेतृत्वाकडून जिल्हा परिषद नवी ऊर्जा आणि विकासाची दिशा अपेक्षित आहे.
बोथली – कवठी जि प क्षेत्रात नागरिकांच्या अडचणींवर प्रत्यक्ष संवाद साधत, मूलभूत सुविधांचा विकास व पारदर्शक प्रशासन देण्याचा संकल्प रोहित बोमावार यांनी व्यक्त केला आहे. युवकवर्गाचा मोठा पाठिंबा आणि वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास मिळाल्याने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
जिल्हा परिषदच नव्हे तर संपुर्ण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी मी सदैव तयार आहे. तरुण पिढीच्या बळावर विकासाचे नवे पर्व घडवू,” असे रोहित बोमावार यांनी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उमेदवारीमुळे तालुक्यात उत्सुकता आणि रंगत वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



