Home Political आळंदीत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्या विविध विकासकामांचे भूमिपूजन…

आळंदीत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्या विविध विकासकामांचे भूमिपूजन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधीमुळे पावन झालेल्या आळंदी नगरीत रविवारी (दि. २६) धार्मिक व विकासात्मक उपक्रमांचा मेळ साधणारा सोहळा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देहू फाटा येथील प्रस्तावित भक्तनिवास इमारतीचे बांधकाम व महाद्वार ते शनी मंदिर आणि पुंडलिक मंदिर परिसरातील दगडी घाट पुनर्निर्माण कामांचे भूमिपूजन होणार आहे.

          या सोहळ्यात ५० रुपयांतउपमुख्य मंत्री उपलब्ध ज्ञानेश्‍वरी पारायण ग्रंथाच्या प्रतीचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्याधिकारी माधव खांडेकर, तसेच आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त योगी निरंजननाथ, ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, डॉ. भावार्थ देखणे, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार, अक्षय महाराज भोसले आणि राहुल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

           संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे यांनी २५ कोटींच्या निधीची घोषणा केली होती. त्यातील दहा कोटी रुपयांचा निधी नगर विकास विभागाने २८ मे रोजी विशेष अनुदान म्हणून मंजूर केला आहे. देहू फाटा येथे उभारला जाणारा भक्तनिवास पूर्ण झाल्यानंतर तो आळंदी देवस्थानकडे हस्तांतरित होणार आहे.

           दरम्यान, शनी मंदिर ते महाद्वार आणि पुंडलिक मंदिर परिसरातील दगडी घाट पुनर्निर्माणासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांचे भूमिपूजन फ्रुटवाले धर्मशाळा परिसरात होणार आहे.

           मराठी भाषेचा गौरव म्हणून छापण्यात येणाऱ्या ज्ञानेश्‍वरी ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे शासनाकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. ही पारायण प्रत वारकऱ्यांना केवळ ५० रुपयांत उपलब्ध होणार आहे.

           चैतन्य महाराज कबीर म्हणाले, “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्या सहकार्याने आळंदी देवस्थानच्या विकासाला गती मिळाली आहे. भक्तनिवास, घाट पुनर्निर्माण, ज्ञानेश्‍वरी पारायण प्रताबरोबरच वारकरी नागरी रुग्ण तपासणी केंद्रही भक्तनिवासात सुरू होणार असून, त्याचे उद्‌घाटनही उद्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होईल.”