Home Crime शहरातील २७ घरफोडीचे गुन्हे उघडकीस… — अमरावती शहर गुन्हे शाखेची कारवाई…...

शहरातील २७ घरफोडीचे गुन्हे उघडकीस… — अमरावती शहर गुन्हे शाखेची कारवाई… — ७२ घरफोड्या करणारी आंतरराज्यीय घरफोडी टोळी ताब्यात…   — ३६ लाखांचा मुददेमाल जप्त… — चोरी केलेले सोने जळगाव येथील सोनारांना विकले…

  अबोदनगो चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

         दखल न्युज भारत 

       अमरावती शहर गुन्हे शाखेने आंतरराज्यीय पातळीवर सक्रिय घरफोडी टोळीवर लक्ष घालून एक मोठी कारवाई केली आहे. सदर टोळीने शहरात २७ घरफोडी केलेल्या असून, एकूण २१,३६,६८८/- रू. किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. शहरातील २७ घरफोड्यांपैकी १० घरफोड्या गाडगेनगर पोलिस स्टेशन भागातील असून, ५ फ्रेजरपुरा, ७ राजापेठ, २ नांदगाव पेठ, २ खोलापुरी गेट व १ नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील आहे.

        दिनांक ०९/०९/२०२५ रोजी मा.दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर व अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अमरावती यांचे राहते घर, राज रेसीडेन्सी, विद्या कॉलनी, अमरावती येथे अज्ञात चोरांनी चोरी करून सोन्या-चांदीचे दागिने तसेच नगदी चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे नोंद झाली होती (अप. क्र. ७२९/२०२५, कलम ३०५(१), ३३१(३) भा.न्या.स.).

        अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.संदीप चव्हाण यांनी सदर गुन्ह्याची दखल घेतली आणि पथकाला तात्काळ कारवाईसाठी आदेश दिले. गुन्हे शाखेच्या तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचे तपशील निश्चित केले गेले.

        सदर गुन्ह्याचे आरोपी आंतरराज्यीय टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना जळगाव व सुरत (गुजरात) येथून ताब्यात घेण्यासाठी पथक गेले असता, आरोपी आपले राहते ठिकाण सतत बदलत होते. १० दिवसांच्या सततच्या पाळतीनंतर आणि चौकशीच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश इंगोले, सपोनि मनीष वाकोडे व पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

         तपासात आरोपींनी वेळोवेळी अमरावती शहरात २७ घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून जप्त मुददेमालमध्ये १२० ग्रॅम सोने (किं.अ. १३,३०,०००/- रू.), ५०० ग्रॅम चांदी (किं.अ. ९०,०००/- रू.), ४ मोबाईल (किं.अ. ५०,०००/- रू.), चारचाकी वाहन मारुती स्वीफ्ट (४६,०००/- रू.),

        नगदी ८८८/- रू (५रू व १०रू चे सिक्के), नाणे (किं.अ. ३,६००/- रू.), इंटरनेटसाठी ३ डोंगल (किं.अ. २०००/- रू.), मिर्ची स्प्रे ४ नग, जीयो कंपनीचे वायफाय राउटर (किं.अ. २००/- रू.) व चारचाकी वाहनाच्या डुप्लीकेट नंबर प्लेट १४ नग (किं.अ. १४,०००/- रू.) यांचा समावेश असून सदर जप्त मुददेमालाची एकूण किंमत २१,३६,६८८/- रू. इतकी आहे.

अटक करण्यात आलेल्या ४ आरोपींमध्ये 

१) अमोल गोकूळ पाटील, वय ३२, रा. मोहाडी, ता. जामनेर, जि. जळगाव,

२) सागर लक्ष्मण देवरे, वय ३०, रा. मोहाडी, ता. जामनेर, जि. जळगाव,

३) निखील उर्फ पिस्तूल कैलास पाटील, वय २४, रा. मांडळ, ता. अमळनेर, जि. जळगाव, 

४) मिलींद संजय खैरनार, वय २९, रा. आराधना पॅलेस, जोळवा, ता. पळसाना, जि. सुरत यांचा समावेश आहे.

         सदर आरोपींच्या मागील इतिहासावरुन समजते की त्यांनी जळगाव, छत्रपती संभाजी नगर, पुणे, अकोला तसेच भावनगर (गुजरात) येथे एकूण ७२ घरफोडीचे गुन्हे केले आहेत. चोरी केलेले सोने वेळोवेळी जळगाव येथील सोनारांना विकले गेले होते.

        ही कारवाई अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली केली गेली असून, पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण व त्यांच्या पथकाने आरोपींच्या हालचालींवर पाळत ठेवून मोठ्या शिताफीने आणि कौशल्याने त्यांना ताब्यात घेतले.

         सदर कारवाईमुळे शहरातील आंतरराज्यीय घरफोडी टोळीचे तडजोडीतून उध्वस्त होणारे गुन्हे उघड झाले आणि मोठ्या प्रमाणावर मुददेमाल जप्त करण्यात आला, जे नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा यश ठरले आहे.