कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी येथे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमानाने रानभाजी महोत्सव व विक्री प्रदर्शनी कार्यक्रम दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
रानभाजी महोत्सवास ना.ॲड.श्री आशिषजी जयस्वाल राज्य कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मंत्री महोदय यांच्या शुभहस्ते क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मंत्री महोदय यांचे स्वागत श्री.सुभाषजी जाधव गटविकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी व तालुका कृषी अधिकारी श्री.राकेशजी वसु यांनी आंब्याचे रोपटे व शाल श्रीफळ देऊन केले तसेच उपस्थित मान्यवरांच्या स्वागताचा कार्यक्रम आटपून कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.चंद्रकांतजी देशमुख कृषी अधिकारी पंचायत समिती यांनी केले.
तालुका कृषी अधिकारी श्री.राकेश जी वसु यांनी आपल्या मार्गदर्शनातुन रानभाज्याचे दैनंदिन आहारात व आरोग्याच्या दृष्टीने किती उपयुक्त असून त्यापासून मिळणारे खनिजेयुक्त व औषधी गुणधर्म असलेले रानभाजीचे सेवन हे नागरिकांनी केले पाहिजे त्यापासून आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढून मधुमेह , पोटदुखी, खोकला व उच्च रक्तदाब यासारख्या रोगाला प्रतिबंध करता येईल असे आपल्या मार्गदर्शनातून प्रतिपादन करण्यात आले.
यावेळी ना.ॲड. श्री.आशिषजी जयस्वाल यांनी फास्ट फूडचा युगात दुर्मिळ होत चाललेल्या जंगली व रानभाजी आपण सर्व नागरिकांनी सेवन केले पाहिजे आपल्या व कुटुंबाचे आरोग्य निरोगी ठेवले पाहिजे ही काळाची गरज असून आपण सर्व नागरिकांनी सदर महोत्सवाचा लाभ घेतल्या पाहिजेत व कृषी विभागातील विविध योजनेतून निवड झालेल्या लाभार्थी शेतकरी बांधवांना मंत्री महोदय यांच्या शुभहस्ते पूर्वसंमती वितरित करण्यात आल्या व प्रगतशील शेतकरी बांधवांचा सत्कार करून गौरविण्यात आले.
कृषी यांत्रिकीकरण योजनेतून निवड झालेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, रोटावेटर, कल्टीवेटर या औजारांचे माननीय मंत्री महोदय यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी पारशीवनी श्री राकेशजी वसु यांनी शेतकरी हितार्थ शेती विषयक विविध बाबींची माहिती देणारे ॲप व पोर्टलची लिंक क्यू आर कोड सह तयार केलेल्या फलकाचे अनावरण मंत्री महोदय यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मंत्री महोदयांनी स्वतः आपल्या मोबाईल मध्ये क्यू आर कोड स्कॅन करून सर्व लिंक संकलित करून मोबाईल वरती पाहणी केली, तयार केलेले फलकाच्या शेतकरी हितार्थ उपयोग लक्षात घेऊन तालुका कृषी अधिकारी यांचे विशेष कौतुक देखील करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये ५२ रानभाजी स्टॉल शेतकरी बांधवाकडून लावण्यात आले होते,त्यामध्ये काटोल, अंबाडी, सुरण, माट भाजी, केना, चिवड, शेवगा, हादगा, गुळवेल, अळू, खापरखुटी, करवंद, गोड भाजी, कुंजर, इत्यादी औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचा समावेश होता.
सदर महोत्सवास एकूण ७२०००/- रुपयांची रानभाजी व इतर वस्तू ग्राहकाकडून खरेदी करण्यात आल्या. यावेळी श्री सुधाकरजी मेंगर (नियोजन समिती सदस्य जिल्हा नागपूर) उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती. ग्रीष्मा डेहने, तहसीलदार पारशिवनी श्री. सुरेशजी वाघचौरे, गटविकास अधिकारी श्री सुभाषजी जाधव, तालुका कृषी अधिकारी श्री.राकेशजी वसु, या मान्यवरांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी बांधव श्री अतुलजी हजारे, श्री राहुल जी मेंगर, श्री प्रेमजी भोंडेकर, श्री रोशन पिंपळापुरे, श्री राजू भोरकर, श्री दीपक शिवरकर, सौ प्रतिभाताई कुंभलकर, श्री.व्यंकटजी कारेमोरे, श्री.धनराजजी चकोले, उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी श्री.विवेकानंद शिंदे यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकरी बांधवांचे व मान्यवरांचे आभार प्रदर्शन श्री.प्रमोदजी सोमकुवर (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक पारशीवनी) यांनी व्यक्त केले.
सदर महोत्सवास प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व महिला शेतकरी यांची उपस्थिती होती.



