दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या प्रभाग रचना समितीमार्फत हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे यांचेमार्फत नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सादर करण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विभागीय आयुक्तांना प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला असून, त्यानुसार माननीय विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी आळंदी नगरपरिषद प्रभाग रचना प्रस्तावास मान्यता दिली आहे.
निश्चित कार्यक्रमानुसार, प्रारूप प्रभाग रचना 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर प्रभाग रचना नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर तसेच अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. आळंदी नगरपरिषद क्षेत्रात एक ते नऊ असे नऊ प्रभाग प्रत्येकी दोन सदस्यीय तर दहावा प्रभाग तीन सदस्यीय असा निश्चित करण्यात आला आहे.
नागरिकांनी प्रारूप प्रभाग रचनेबाबत आपल्या हरकती व सूचना लेखी स्वरूपात नगरपरिषद कार्यालयातील आवक-जावक विभागात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त हरकती व सूचनांवर संबंधितांना स्वतंत्रपणे सुनावणीची संधी दिली जाणार आहे. मात्र, मुदत संपल्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही, असे मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद यांनी कळविले आहे.



