शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा परिसर व केंद्रीय विद्यालय शाळा भागात सध्या बिबट्यासह मोकाट जंगली प्राण्यांचा वाढता वावर भयानक स्वरूप धारण करीत आहे.
विशेषतः शाळेच्या आवारात बिबट्या दिसल्याने विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे उभा राहिला आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून या संदर्भात शिवसेना भद्रावतीच्या वतीने वनविभाग भद्रावती कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे. सदरहु निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या मार्गदर्शनात व शिवसैनिक सुरज शाहा यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
परिसरातील त्या बिबट्याला तातडीने जेरबंद करावे.नियमित पेट्रोलिंगसाठी विशेष पथक तैनात नेमावे,नागरिक व शाळांना सुरक्षिततेबाबत योग्य सूचना व मार्गदर्शन द्यावे अश्या मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
“विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात असताना प्रशासनाची उदासीनता दुर्लक्षित केली जाणार नाही. जर त्वरित पावले उचलली नाहीत, तर शिवसेना रस्त्यावर उतरेल व तीव्र आंदोलन करेल “असा इशारा देखील शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
निवेदन देताना जिल्हा प्रसिध्दी प्रमुख आशिष ठेंगणे, युवा शिवसैनिक सुमित हस्तक, उपशहरप्रमुख आकाश वानखडे, उपशहरप्रमुख मनीष बुच्चे, उपतालुका प्रमुख सुंदरसिंह बावरे, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम यांच्यासह शिवसेनाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.



