दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पंढरपूर – आषाढी एकादशीचे औचित्य साधत लाखो भाविकांचा महापूर दरवर्षी पंढरपूरात उसळतो. यंदाही १२ ते १३ लाख भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होणार आहेत. या भक्तांसाठी मंदिर समितीने विशेष तयारी केली असून, १३ लाख ५० हजार बुंदी लाडू व ६० हजार राजगिरा लाडूंचा महाप्रसाद बनवण्यात येत आहे. या प्रसादाची अल्पदरात विक्री होणार असून, त्याला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय.
प्रसादाची भव्य निर्मिती – भक्तांसाठी गोड आठवण…
विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनानंतर देवाचा प्रसाद घेण्याची परंपरा जपताना, मंदिर समितीने यंदा लाडूंची विक्रमी निर्मिती हाती घेतली आहे. बुंदी लाडूंशिवाय राजगिरा लाडूंचाही समावेश असून, भाविक या प्रसादाला घरी घेऊन जाण्याचा आनंद लुटणार आहेत. लाडू तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, भक्तांच्या मागणीला पूर्ण न्याय देण्याचा संकल्प समितीने केला आहे.
विठ्ठल मंदिराचा दिव्य साज – विद्युत रोषणाईने उजळला पंढरपूर…
आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि परिसर रंगीबेरंगी विद्युत दिव्यांनी उजळून निघाला आहे. शिखर, संत नामदेव पायरी, पश्चिम द्वार, संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, तुकाराम भवन आणि विठ्ठल सभामंडप अशा सर्व प्रमुख स्थळांवर आकर्षक लायटिंग करण्यात आले आहे. यात्रेचा सोहळा आता बहरात आला असून, हे दृष्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढतेय.
वारकऱ्यांची पंढरीवारी – सेवाभावाने सज्ज पंढरपूर…
राज्यभरातून पायी दिंड्या घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी मंदिर समिती सज्ज झाली आहे. राहण्याच्या, पिण्याच्या पाण्याच्या व स्वच्छतेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांची सोय आणि विठुरायाच्या भेटीचा आनंद यामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवक प्रयत्नशील आहेत.



