Home Maharashtra आषाढी वारीसाठी भक्कम सुरक्षा आणि सोयीसुविधांचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन… — एका...

आषाढी वारीसाठी भक्कम सुरक्षा आणि सोयीसुविधांचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन… — एका मिनिटात ३२ ते ३५ भाविकांना दर्शन होईल…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पंढरपूर – आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून लाखो वारकरी पंढरपूरकडे येत असताना, यंदाच्या वारीत त्यांना अधिक सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन आखले आहे.

       जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन रांगेत घुसखोरीमुळे वारकऱ्यांच्या भक्तिभावाला व्यत्यय येत होता. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा घुसखोरीच्या संभाव्य ठिकाणी जाळ्या बसवण्यात आल्या असून, त्यामुळे रांगेतील शिस्त राखली जाणार आहे.

दर्शनासाठी काटेकोर वेळापत्रक…

       वारकऱ्यांना कळसदर्शन, मुखदर्शन आणि पदस्पर्श दर्शन मिळावे यासाठी खास व्यवस्थापन करण्यात आले आहे. एका मिनिटात ३२ ते ३५ भाविकांना दर्शन होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचे ठोस पावले…

         वारी दरम्यान संभाव्य चेंगराचेंगरी, पुराचे पाणी, शॉर्टसर्किट, गॅसचा स्फोट यांसारख्या आपत्तींवर तातडीने कारवाई करता यावी यासाठी १३ हॉटस्पॉट ओळखून तेथे २२ सदस्यीय विशेष पथक तैनात केले जाणार आहे. होडी व्यवस्थापनासाठी होडी चालकांची माहिती, फिटनेस सर्टिफिकेट, २० प्रवाशांची मर्यादा व १० निश्चित ठिकाणांसाठी नियोजन पूर्ण झाले आहे.

हाय-टेक नियंत्रण व्यवस्था…

       संपूर्ण वारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसस्थानक परिसरात अत्याधुनिक कंट्रोल युनिट उभारण्यात येणार असून, ५५ इंची एलईडीद्वारे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखरेख केली जाईल. यासाठी १५० टू-जी वायरलेस फोनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरक व्यवस्था…

        गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पावसाचा अंदाज गृहित धरून पूर्वतयारी करण्यात आली आहे. ३० हजार घनमीटरच्या मुरुमीकरणाच्या तुलनेत यंदा ७४ हजार घनमीटरचे काम केले गेले आहे. तसेच, ७ लाख १२ हजार चौरस फुटांचा भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. यामध्ये ९ ठिकाणी जर्मन हँगर तर ९४ ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभारले जात आहेत. प्रत्येक साडेतीन किलोमीटरवर वॉटरप्रूफ विश्रांतीसाठी मंडप असणार आहे.

        यावर्षी २२ ते २४ लाख भाविक येण्याची शक्यता असून, त्यांना कोणतीही अडचण न येता दर्शन, निवास आणि सुरक्षितता मिळावी यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.