Home Maharashtra फलटण नगरीत माऊलींच्या पालखीचे भक्तिमय स्वागत, वारकऱ्यांचा महासागर विठ्ठलमय…

फलटण नगरीत माऊलींच्या पालखीचे भक्तिमय स्वागत, वारकऱ्यांचा महासागर विठ्ठलमय…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

फलटण – पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ, “ज्ञानोबा-तुकाराम” चा गजर, टाळ मृदुंगांचा निनाद आणि भगव्या पताकांनी नटलेला लाखो वारकऱ्यांचा महासागर शनिवारी ऐतिहासिक फलटण नगरीत विसावला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे शहरात मोठ्या उत्साहात, भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

         या आधी सकाळी ६:३० वाजता तरडगाव येथील पालखी तळावरून सोहळ्याने प्रस्थान केले. सुरवडी येथे साळुंखे पाटील परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         पुढे निंभोरे येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मित्रमंडळ, सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. वडजल येथेही ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले.

        पुढे संध्याकाळी फलटण शहराच्या हद्दीत पालखीने प्रवेश केला. नगरपरिषद प्रशासन, नागरिक व विविध संस्थांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात माऊलींचे स्वागत केले. सगुणामातानगर (मलठण), सदगुरु हरीबुवा मंदिर, पाचबत्ती चौक, ऐतिहासिक राम मंदिर, गजानन चौक, महात्मा फुले चौक, सफाई कॉलनी, गिरवी नाका मार्गे पालखीने शहरात पदस्पर्श केला.

          राम मंदिराजवळ नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टतर्फे जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. अखेरीस विमानतळ परिसरात समाजआरती पार पडून पालखी सोहळा मुक्कामासाठी विसावला. संपूर्ण फलटण शहरात भगव्या पताका, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “हरी नामाच्या” जयघोषात एक आगळे वेगळे भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

        फलटण येथे शनिवारी रात्रीचा मुक्काम केल्यानंतर, रविवारी सकाळी ६ वाजता पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी प्रस्थान करणार आहे. विडणी येथे न्याहारी, पिंप्रद येथे दुपारचे भोजन वाजेगाव येथे विसावा यानंतर सायंकाळपर्यंत सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम बरड येथे पोहोचणार आहे. सोमवारी दुपारी हा वैष्णवांचा मेळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

भाविकांमध्ये उत्साह शिगेला…

        पंढरपूरची वाट चालणाऱ्या या संतपंथात सहभागी होण्यासाठी अनेक नवयुवक, महिलावर्ग, वृध्द व लहान मुलांचा उत्साह दांडगा आहे. “पांडुरंगाच्या चरणी भेट” ही एकमेव भावना हृदयात बाळगून लाखो वारकरी आपल्या लाडक्या माऊलींसोबत विठोबाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत.