Home Maharashtra राजकीय ‘व्हीआयपी’ दौऱ्यांनी विठ्ठल दर्शनात अडथळे; मुख्यमंत्र्यांनी अशा दौऱ्यांना वेळीच आवर घालावा,अशी...

राजकीय ‘व्हीआयपी’ दौऱ्यांनी विठ्ठल दर्शनात अडथळे; मुख्यमंत्र्यांनी अशा दौऱ्यांना वेळीच आवर घालावा,अशी वारकऱ्यांची मागणी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सध्या पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, अवघ्या काही दिवसांवर असलेला आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा जवळ येताच मंत्र्यांचे, आमदारांचे आणि खासदारांचे दौरेही अचानक वाढले आहेत. ‘वारी नियोजनाचा आढावा’ हे निमित्त करून या नेत्यांचा दररोजचा पंढरपूर दौरा सुरू असून, त्यामुळे प्रत्यक्ष दर्शनासाठी तासन्‌तास रांगेत उभे असलेल्या वारकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

        शासकीय नियोजनात गुंतलेल्या अधिकाऱ्यांचीही यात प्रचंड दमछाक होत असून, अनेकदा मंदिर प्रशासन, पोलीस आणि या राजकीय मंडळींच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी होत आहेत. दर्शनासाठी आलेल्या या व्हीआयपी मंडळींबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्तेही येतात आणि थेट मंदिरात घुसखोरी करत दर्शन घेतात. यामुळे रांगेतील वयोवृद्ध भाविकांना अपमानास्पद थांबा सहन करावा लागतो.

       वारी नियोजनाचा आढावा घेण्याऐवजी हे नेते थेट ‘शॉर्टकट’ मार्गाने विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनास जात असून, त्यांच्या सत्कार व स्वागतासाठी प्रशासनाचा अमूल्य वेळ वाया जात आहे. याच कारणामुळे प्रत्यक्ष सेवाभावी कामांवर परिणाम होत आहे.

      वारकऱ्यांच्या सेवा-सुविधांमध्ये कसूर होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी अशा दौऱ्यांना वेळीच आवर घालावा, अशी संतप्त मागणी वारकरी संप्रदायातून पुढे आली आहे. “वारी ही जनतेची आणि भक्तीची आहे, राजकीय नौटंक्यांची नाही,” अशा शब्दांत वारकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. दर्शनाची रांग आणि राजकीय घुसखोरी यामधील संघर्ष जर वेळेतथांबवला गेला नाही, तर वारीतील शिस्त आणि अध्यात्मिक वातावरणाचे मोठे नुकसान होईल.