Home Political सोनाली मारणे यांचा काँग्रेसला रामराम; शिवसेनेत जाहीर प्रवेश…

सोनाली मारणे यांचा काँग्रेसला रामराम; शिवसेनेत जाहीर प्रवेश…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पुणे : काँग्रेस पक्षाच्या माजी महिला शहराध्यक्ष आणि प्रदेश सचिव सोनाली मारणे यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

      राजधानी मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीत मारणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक राहुल तुपेरे, मंगल पवार, मीनल धनवटे, प्रमोद बारहाते, लक्ष्मीकांत गोनेकर, भक्ती गाटे, किरण मारणे, प्रथमेश धुमाळ, महेश पवार आदी कार्यकर्तेही उपस्थित होते.

      प्रवेशानंतर बोलताना सोनाली मारणे म्हणाल्या, “२०११ पासून मी काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. मात्र, विरोधी पक्ष म्हणून ज्या पद्धतीने पक्षाने कार्य करायला हवे, तशी दिशा पक्षात सध्या दिसून येत नाही. पक्षात काम करणाऱ्यांना योग्य न्याय दिला जात नाही. त्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.”

      मारणे यांनी पुढे सांगितले की, “लाडक्या बहीण योजनेचे शिल्पकार व स्वतःला ‘DCM – Dedicated Common Man’ मानणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे होते. बाळासाहेब ठाकरे यांची ‘८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण’ ही शिकवण शिंदे साहेब प्रत्यक्षात उतरवत आहेत. त्यामुळेच मी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे.” मारणे यांच्या प्रवेशामुळे पुण्यातील महिला मतदारांमध्ये शिवसेनेला अधिक बळ मिळेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.