Home Maharashtra तरडगाव साक्षी ठरलं ऐतिहासिक उभ्या रिंगणाचं – भक्तिभावात न्हालं चांदोबाचा लिंब…

तरडगाव साक्षी ठरलं ऐतिहासिक उभ्या रिंगणाचं – भक्तिभावात न्हालं चांदोबाचा लिंब…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

तरडगाव – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आज दुपारी सातारा जिल्ह्यातील तरडगावजवळील चांदोबाचा लिंब येथे दिमाखात आणि भक्तीमय वातावरणात पार पडले. ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखोचच वारकऱ्यांनी परिसरात एकच गर्दी केली होती. “अवघा आमुचा वारकरी भोळा” म्हणत, हा दैवी क्षण डोळ्यात साठवण्यासाठी श्रद्धेने नतमस्तक झालेला जनसागर आज तरडगावात नांदत होता.

      फलटण तालुक्याच्या वतीने सरदेच्या ओढ्यावर माउलींच्या पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यानंतर चांदोबाचा लिंब येथे पार पडलेला उभ्या रिंगणाचा सोहळा हा वारकरी परंपरेचा उत्कट आविष्कारक ठरला. मृदंग-टाळांच्या निनादात, “ज्ञानोबा माउली, तुकाराम” च्या जयघोषात, भक्तिपूरित नादभरित वातावरणात रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली.

       चोपदारांनी आकाशाकडे चोप उगारताच, क्षणात वातावरण शांत झाले. कोणतीही सूचना न देता हजारो वारकरी अनुशासितपणे बाजूला झाले आणि अश्वाच्या दौडीसाठी मार्ग तयार झाला. या मार्गावर रंगावलीच्या स्वयंसेवकांनी रांगोळ्यांनी सजावट करत दृश्यालाही भक्तीचा साज चढविला.

       रथापुढील २७ दिंड्यांमधून माउलींचा अश्व भक्तिभावाने पळवत आणण्यात आला. दोन्ही अश्वांची एकाच वेळी धाव, माउलींच्या रथाभोवती घातलेली प्रदक्षिणा आणि त्यानंतर घेतलेले पादुकांचे दर्शन — या सर्व क्षणांत हजारो वारकऱ्यांनी देहभान विसरून भक्तीच्या रंगात रंगून गेले. हा क्षण म्हणजे जणू वारकरी जीवनातील परमोच्च भक्तिपर्व आहे. यानंतर, सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी अश्वास पुष्पहार अर्पण केला, खारीक-खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला.

       अश्वाच्या पुढेमागे दौडीने रिंगण सोहळा पूर्णत्वास गेला. शेवटी, चोपदारांनी रथावर उभे राहून दंड फिरवत रिंगण संपल्याची घोषणा केली आणि माउलींचा सोहळा पुढील प्रवासासाठी तरडगावाकडे मार्गस्थ झाला. या संपूर्ण सोहळ्यात वारकऱ्यांचा शिस्तबद्ध सहभाग, भक्तिभाव आणि आत्मीयता याचे दर्शन घडले. साताऱ्याच्या भूमीत पार पडलेले हे उभे रिंगण, वारकरी परंपरेचा गौरवशाली वारसा पुढे नेणारा एक स्मरणीय क्षण ठरला.