Home कृषी सवलतीच्या दरात धान व तूर बियाणे…

सवलतीच्या दरात धान व तूर बियाणे…

ऋषी सहारे

   संपादक

गडचिरोली : अन्न आणि पोषण अभियान अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान आणि तूर पिकासाठी सवलतीच्या दराने प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

   या योजनेंतर्गत 10 वर्षांच्या आत विकसित वाणांसाठी तसेच 10 वर्षांहून जुन्या वाणांसाठी वेगवेगळ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध आहे. जिल्ह्यासाठी प्रमाणित बियाण्यांचे लक्ष्य 10 वर्षांतील धान वाणासाठी 876 क्विंटल, 10 वर्षावरील धान वाणासाठी 438 क्विंटल, 10 वर्षांतील तूर वाणासाठी 30 क्विंटल आणि 10 वर्षावरील तूर वाणासाठी 20 क्विंटल इतके निश्चित करण्यात आले आहे.

    जिल्ह्यातील विविध बियाणे वितरकांकडे सध्या 10 वर्षांतील धान वाणाचे 747 क्विंटल, 10 वर्षावरील धान वाणाचे 290 क्विंटल, 10 वर्षांतील तूर वाणाचे 5 क्विंटल आणि 10 वर्षावरील तूर वाणाचे 4 क्विंटल बियाणे उपलब्ध असून, जिल्ह्यातील 18 वितरकांकडे हे बियाणे उपलब्ध आहे. या वितरकांची यादी कृषी विभागामार्फत लवकरच तालुकानिहाय प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

     शेतकऱ्यांना भात पिकासाठी 10 वर्षांतील बियाण्यावर प्रति क्विंटल 2000 रुपये आणि 10 वर्षावरील बियाण्यावर 1000 रुपये तर तूर पिकासाठी 10 वर्षांतील बियाण्यावर प्रति क्विंटल 5000 रुपये आणि 10 वर्षावरील बियाण्यावर 2500 रुपये इतके अनुदान देय आहे. लाभार्थी निवडीसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर बियाणे वितरण करण्यात येणार असून प्रत्येक शेतकऱ्याला किमान 0.20 हेक्टर ते कमाल 1 हेक्टर क्षेत्राकरिता हा लाभ मर्यादित आहे.

        इच्छुक शेतकऱ्यांनी आपला 7/12 उतारा, आधार कार्ड आणि फार्मर आयडीसह संबंधित बियाणे वितरकांशी संपर्क साधून सवलतीच्या दरात बियाणे घ्यावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी किंवा महाबीज कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.