या चिंतनात धर्म हा शब्द कर्तव्य या अर्थाने वापरला आहे.जसे की मुलांचे आईवडिलाप्रतीचे कर्तव्य म्हणजे धर्म,आईचे मुलाप्रती कर्तव्य म्हणजे धर्म,नागरिकाचे देशाच्याप्रती कर्तव्य म्हणजे धर्म.
या अर्थाने लोकशाहीचा धर्म म्हणजे देशातील नागरिकांना जाती ,धर्म,प्रांत,भाषा,लिंग या चष्म्यातून न पाहता ,म्हणजेच भेदभाव न करता ” लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेले राज्य किंवा सत्ता म्हणजे लोकशाही ” अशी लोकशाहीची व्याख्या असेल तर ” लोक ” म्हणजे देशातील सारेच नागरिक ,मतदार मग ते कोणत्याही जातीचे धर्माचे प्रांताचे भाषेचे स्त्री असोत की पुरुष. असे असेल तर लोकशाही ही कुण्या एका जातीची धर्माची होऊ शकत नाही.
परंतु आपल्या देशात विचाराची संकुचित परंपरा असल्यामुळे,म्हणजेच भारतीयांची व्यापक दृष्टी नसल्यामुळे,म्हणजेच कूपमंडुक प्रवृत्तीमुळे येथील मतदार आणि राजकीय पुढारी जातीचा आणि रूढ धर्माचा सर्रास वापर करतात आणि इलेक्शन जिंकतात,कारण निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी धर्म हे साधन त्यांच्यासाठी फारच उपयोगी ठरत असते.संविधानाच्या दृष्टीने हे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे,निवडणुकीत जात धर्माचा वापर केल्यास शिक्षा होऊ शकते,किंवा निवडून आले तरी ते पद खारीस होऊ शकते,जर न्यायाधीशांनी ठरविले तर,तसे पुरावे कोर्टात सादर केले तर.पण असे घडताना दिसत नाही,याला कारण उमेदवार जागृत नसतात,असले तर कोर्टात जात नाहीत,गेले तर पुरावे सादर करीत नाहीत,केले तर कोर्टाचे आणि वकिलांचे साठेलोटे ,यामुळे लोकशाहीला धाब्यावर बसविले जाते.लोकशाहीचा धर्म म्हणजे कर्तव्याचे पालन केले जात नाही.म्हणजेच लोकशाहीला हा भ्रष्टाचार होय,भ्रष्टाचार म्हणजेच अधर्म.म्हणजेच लोकशाहीचा धर्म सोडणे होय.असे असेल तर लोकशाही टिकणे शक्य नाही.लोकशाही ऐवजी इथे धर्मशाही येईल.म्हणजेच बहुमताचा जो धर्म त्याच धर्माची लोकशाही,
आणि जगातील ज्या देशात ज्या धर्माच्या लोकांची संख्या जास्त असेल त्याच धर्माची सत्ता असेल,त्याच धर्माचे ते राज्य असेल.देश मात्र अनेक धर्माचा असूनही देशाची लोकशाही ही एकच धर्माची असेल,असे चित्र ज्या देशाचे असेल त्या देशातील अल्पसंख्य धर्मियांच्या नागरिकांवर अन्याय होईल,त्यांचेवर अत्याचार होतील,त्यांना मानवीहक्क मिळणार नाहीत,ते स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या मूल्यांपासून वंचित राहतील.ते त्या देशात दुय्यम नागरिक म्हणून अपमानित जीवन जगतील.आणि ज्या देशात जात आणि धर्मामुळे जर नागरिकांना समान संधी आणि समान दर्जा मिळत नसेल तर तो लोकशाहीचा धर्म कसला ? तो लोकशाहीचा अधर्मच समजावा.
रूढार्थी धर्मापेक्षा लोकशाही कधीही श्रेष्ठच असते.कारण लोकशाहीला धर्म जात नसते,ती सर्वसमावेशक आणि देशातील साऱ्याच नागरिकांचे समाजहित जोपासणारी असते.म्हणून लोकशाहीला धर्म चिकटविता कामा नये.असे कृत्य जे लोक करतात ते लोकशाहीचे मारक समजले पाहिजे.
लोकशाहीला पर्याय नाही असे विचारवंत म्हणतात.लोकशाही नसेल तर मग धर्माच्या रस्त्याने देशात हुकुमशाही येईल. आणि त्यावेळी सारेच लोक नागरिक ,मतदार न राहता राजाची प्रजा म्हणून राहतील,म्हणजेच गुलाम म्हणून राहतील.गुलाम याचा अर्थ तोंड असून मुक्का,हातपाय असून परावलंबी,बुद्धी असून निर्बुद्ध, कान असून बहिरा,डोळे असून आंधळा अशी अवस्था म्हणजे गुलामी.देईल ते खायचे,सांगेल ते करायचे आणि ऐकायचे, बस म्हटले तर बसायचे, ऊठ म्हंटले की उठायचे,म्हणजेच नोकर,म्हणजेच दास.म्हणजेच गुलाम.ज्याला हक्कच नसतात.अशी परिस्थिती ओढवून घ्यायची असेल तर धर्माला महत्त्व द्यावे.नाहीतर धर्माला महत्त्व न देता देशाचे म्हणजेच सर्वांचेच म्हणजे साऱ्याच जाती धर्माच्या लोकांचे हित हवे असेल,स्वातंत्र्यात जगायचे असेल तर ,आपला राजा आपणच निवडायचा असेल,म्हणजेच लोकशाहीचा धर्म पाळायचा असेल तर धर्माची लोकशाहीला धुडकावून सामाजिक लोकशाही प्रस्थापित करावी लागेल.लोकशाहीचा धर्म की धर्माची लोकशाही हे तुम्हीच ठरवा.



