Home सांस्कृतिक भागवत संप्रदायामुळे धर्म आणि संस्कृती भारतात टिकुन आहे :- हभप चैतन्य महाराज...

भागवत संप्रदायामुळे धर्म आणि संस्कृती भारतात टिकुन आहे :- हभप चैतन्य महाराज लोंढे…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : ग्रंथराज ज्ञानेश्वरी, जी भगवतगीतेवर आधारित आहे, एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीमुळे लोकांना जीवनातील सत्य आणि धर्माचा मार्ग दिसतो, तसेच आत्मज्ञान मिळवून मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवतो, असे सांगितले जाते.

         ज्ञानेश्वरी हे केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर ते एक साहित्यिक आणि तत्त्वज्ञानात्मक कार्य आहे, ज्यात मानवता, सेवाभाव, निःस्वार्थता आणि योग साधनेचे महत्त्व सांगितले आहे. धर्म आणि संस्कृती ही हिंदूस्थान मध्ये कोणी टिकवली असेल तर ती ज्ञानदेवांनी स्थापन केलेल्या भागवत धर्माने टिकवली आहे असे प्रतिपादन आळंदी देवस्थानचे विश्वस्त हभप चैतन्य महाराज लोंढे यांनी सांगितले.

         श्रीक्षेत्र आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर जन्मोत्सव सोहळयात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील प्रथम दिवसाच्या प्रवचन चिंतनाच्या सत्रात हभप चैतन्य महाराज लोंढे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे, ॲड.राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड.रोहिणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, माजी उपनगराध्यक्ष विलास घुंडरे, नंदकुमार कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, सागर भोसले, भाजप नेते संजय घुंडरे, आनंद महाराज तांबे, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण उपस्थित होते.

         हभप चैतन्य महाराज लोंढे म्हणाले की वारकरी व भागवत संप्रदायाचा प्राण ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे. आपली संस्कृती, परंपरा व तत्वप्रणाली हि ग्रंथराज ज्ञानेश्वरी मुळे टिकून आहे. भागवत संप्रदायाचा आचार्य संत ज्ञानेदव आहे. वारकरी व भागवत संप्रदायात संतांचे तत्वज्ञान व आचरण अविभाज्य घटक आहे.

        या जगात मानवतेची क्रांती प्रथम संत ज्ञानदेवांनी केली असून काव्य, भाषासौष्ठव, प्रासादिकता, व्यावहारिक दृष्टान्त, सिद्धान्त, रसाळता आणि तत्त्वचिंतन या सर्वच भूमिकेतून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महाराष्ट्र सारस्वतात आणि मराठी लोकजीवनातही शिखरावर जाऊन बसला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी भविष्य काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या रुपात ई बुक ऑडीओ बुकच्या माध्यामात संत ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान जगाच्या व्यासपीठावर पोहचविणार आहे.