शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
अखिल भारतीय लोक कलावंत सांस्कृतिक समितीच्या वतीने रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कलावंतांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
या महत्त्वपूर्ण भेटीमुळे कलावंतांच्या प्रलंबित प्रश्नांना आता लवकरच न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी सर्वप्रथम कोराडी येथील भवानी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.तेथे उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर,पदाधिकारी थेट सांस्कृतिक क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाकडे रवाना झाले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.समितीच्या सदस्यांनी तत्परतेने दोन्ही मंत्री महोद्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि कलावंतांच्या विविध समस्या तसेच मागण्यांचे निवेदन त्यांना सुपूर्द केले.
या प्रसंगी नागपूरचे पालकमंत्र्यांनी कलावंतांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी पुढील कार्यवाही म्हणून नागपूरच्या समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत.
या सकारात्मक आश्वासनानंतर समितीचे पदाधिकारी आता पुढील टप्प्यात सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईचा दौरा करणार आहेत.
कोणत्याही कलाकाराने स्वतःला असहाय किंवा एकटे समजू नये,असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व कलावंतांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी एकत्र यावे,जेणेकरून परस्परांच्या सहकार्याने कलावंतांचे प्रश्न सोडवणे शक्य होईल,असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
या संपूर्ण मोहिमेत आणि कलावंतांच्या सेवेसाठी समितीचे प्रमुख पदाधिकारी सक्रियपणे सहभागी झाले होते.
यामध्ये संस्थापक अध्यक्ष सारिका उराडे (चंद्रपूर), देवराव खांडेकर (चामोर्शी), सचिव कोमल पारोधी (नागपूर), विदर्भाध्यक्ष विजय मधुमटके (नागपूर), विदर्भ उपाध्यक्ष कैलास मलिक (कामठी), अनिल मेश्राम (नागपूर), राजेंद्र बागडे (नागपूर),मिलिंद मेश्राम (कामठी),रेणुका शेळके (कामठी), ज्योती फुंडे (नागपूर),सुषमा बोकडे,वनिता चिंचोलकर,विधी बानते,रेखा किरमिरे,मंगला सुंकरवार (मूल), यशवंत उराडे (चंद्रपूर) आणि वसंत करंडे (ब्रह्मपुरी) या सर्व सदस्यांचा समावेश आहे.



