दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : “संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाच्या माध्यमातून केवळ स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. पसायदान हा वारकरी संप्रदायाचा आत्मा असून विश्वबंधुत्व, सद्भावना आणि मानवतेचा संदेश देणारा मंत्र आहे. या विचारांचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. पसायदानातील प्रत्येक ओवी समाजाला नवी दिशा देणारी आहे,” असे प्रतिपादन चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.
पुरुषोत्तम मासानिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या दरबारात सुरू असलेल्या हरिनाम महोत्सवात भागवत महाराज साळुंखे लिखित ‘पसायदान हे!’ या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
चैतन्य महाराज देगलूरकर पुढे म्हणाले, “आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात संत ज्ञानेश्वरांचा समतेचा, करुणेचा आणि परस्पर प्रेमाचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. अशा ग्रंथांमुळे नव्या पिढीला संतवाङ्मयाचा परिचय होऊन अध्यात्माकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते.”
ज्ञानेश्वर माऊलींनी सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांकडे पसायदान मागितले असल्याने या ग्रंथाचे प्रकाशनही त्यांच्या चरणसान्निध्यात व्हावे, अशी भावना प्रमोद महाराज जगताप यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या पुढाकारातून हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी माधवदास महाराज राठी, जयंत महाराज गोसावी, एकनाथ महाराज कोष्टी, श्रीपादकाका कुलकर्णी, जयेश महाराज भाग्यवंत, निळोबाराय गोरठाणकर, लक्ष्मण महाराज मोरे, अरविंद सैद यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकार, प्रवचनकार आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



