दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : चैतन्य गोशाळा ट्रस्ट, यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीरामकथा मानस पसायदान’ या नऊ दिवसीय आध्यात्मिक सोहळ्याला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. फुटवाले धर्मशाळा, आळंदी येथे सुरू असलेल्या या कार्यक्रमात दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असून परिसर भक्तिरसाने भारावून गेला आहे.
कार्यक्रमामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पसायदानाचे सामूहिक पठण करण्यात येत असून, त्यानंतर कथा निरुपणकार श्री. रवींद्र पाठक यांच्या ओजस्वी व भावपूर्ण वाणीतील श्रीरामकथेचे निरूपण भाविकांना मंत्रमुग्ध करत आहे. रामायणातील विविध प्रसंगांचेमनातला आध्यात्मिक, सामाजिक आणि संस्कारमूल्यांशी जोडलेले विवेचन उपस्थितांच्या मनाला स्पर्शून जात आहे.
विशेष म्हणजे, श्रीरामकथेबरोबरच माऊलींच्या पसायदानाचेही सखोल निरूपण करण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वकल्याणासाठी व्यक्त केलेल्या पसायदानातील संदेश, मानवतेचे तत्त्वज्ञान, समाजातील सद्भावना आणि भक्तीमार्गाचे महत्त्व यांचे अत्यंत समर्पक विवेचन रवींद्र पाठक करत असल्याने भाविकांना अध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळत आहे.
सद्गुरु श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या कृपाआशीर्वादाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात नामस्मरण, भक्ती आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे. सकाळ व सायंकाळच्या सत्रांमध्ये भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत असून संपूर्ण परिसर रामनामाच्या गजराने दुमदुमून जात आहे.
हा आध्यात्मिक सोहळा दि.३१ मे २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या संकेत वाघमारे यांनी केले आहे.



