दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : भगवद्गीता ही भगवंताची तत्त्वमूर्ती, तर ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाङ्मयमूर्ती होय. ज्ञानेश्वरीत गीतातत्त्वाचे विस्तृत भाष्य ज्ञानदेवांच्या प्रतिभासामर्थ्याने आणि सखोल तत्त्वचिंतनाने विस्तारले आहे. ज्ञानेश्वरी पारायणाचे अनेक फायदे आहेत. हे एक अत्यंत पवित्र आणि ज्ञानवृद्धी करणारे कार्य आहे. ज्ञानेश्वरी वाचल्याने जीवनात सकारात्मकता, शांती आणि आत्मज्ञान प्राप्त होते, तसेच व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक भल्यासाठी मदत होते, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महाराष्ट्र सारस्वताचे अक्षय वैभव आहे असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व्यक्त केले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आळंदी देवस्थानाच्या वतीने ३ मेपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे पुजन व शुभारंभ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. तसेच चंद्रकांतदादा पाटील यांनी काही वेळ ज्ञानेश्वरी पारायण सोहळयात सहभागी होऊन ज्ञानेश्वरी पारायण केले.
यावेळी आ.बापुसाहेब पठारे, नारायण महाराज जाधव, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखीसोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड.रोहिणी पवार, मुख्याधिकारी माधव खांडेकर, गहिनीनाथ महाराज औसेकर, भैय्यासाहेब पाटील, रामभाऊ महाराज राऊत, डि.डि.भोसले पा., नंदकुमार कुऱ्हाडे, राहुल चिताळकर पाटिल, पुरुषोत्तम महाराज मोरे, वैजयंता उमरगेकर, संजय घुंडरे, शंकरराव कुऱ्हाडे, अजित वडगांवकर, राहुल चव्हाण, प्रकाश वाडेकर, ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, कोमलताई शिंदे, योगेश आरु, पांडुरंग वरखडे, श्रीधर कुऱ्हाडे तसेच आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला माऊली भक्तांची अलोट गर्दी झाली होती. सात दिवस जोग महाराज शिक्षण संस्थेच्या समोरील पटांगणात येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे. यामध्ये संत चरीत्र, संगीत भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, भजन आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. टाळ मृदंगाच्या गजरात विठू माउली व ज्ञानेश्वर माउलीच्या जयघोषात वारकरी व आळंदीकर भक्तमंडळी तल्लीन झाले होते.



