Home Maharashtra सावली तालुक्यात अवकाळी पावसाने भातपिकाला मोठा फटका… — कापलेली भातशेती पाण्याखाली;...

सावली तालुक्यात अवकाळी पावसाने भातपिकाला मोठा फटका… — कापलेली भातशेती पाण्याखाली; नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीला…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

        गेल्या आठ दिवसांपासून सावली तालुक्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कापणीला आलेली आणि कापलेली भातशेती पाण्याखाली जाऊन चिखलात रुतली आहे, ज्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील भातशेती संकटात आली आहे.

        भात पीक तयार झाल्याने तालुक्यात काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली होती. मात्र, अवकाळी पावसाने विघ्न घातल्यामुळे शेतीत पाणी साचून पीक आडवे झाले आहेत. सततच्या पावसामुळे भातपीक काळे पडून कुजण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

       सतत पाण्यात राहल्यामुळे पडलेल्या भाताच्या लोंब्यांना पुन्हा मोग आले असून भाताचे पिक आत्ता खाण्यासाठी उपयुक्त राहिले नाही.

          सावली तालुक्यात एकूण २५००० हेक्टरवर भात पीक लागवड केली जाते मुसळधार पावसाने तालुक्यातील अनेक भागांत दाणादाण उडवली आहे. यंदा शेतकऱ्यांना भात पेरणीपासून अनेक संकटांना तोंड द्यावे लागले.

          रोपे मोठी झाल्यावर लागवड करूनही मुसळधार पावसाचा फटका बसला. कापलेली पिके पाण्याखाली गेली आहेत. ही पिके पाण्यातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा जास्तीची मजुरी द्यावी लागत आहे.

          मजुरांची उपलब्धता आणि पावसाचे संकट यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे कृषी खात्याने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 कोट..

       अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.भात शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे करावे.

    आशिष पुण्यपवार 

सामाजिक कार्यकर्ता व्याहाड खुर्द