Home Social राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 113 बटालियन, केंद्रीय राखीव पोलीस बल, धानोरा येथे भव्य...

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 113 बटालियन, केंद्रीय राखीव पोलीस बल, धानोरा येथे भव्य कार्यक्रम…

भाविकदास करमनकर

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

         भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्याने 113 बटालियन, केंद्रीय राखीव पोलीस बल, धानोरा (गडचिरोली) येथील मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

         या प्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशांनुसार राष्ट्रीय एकतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम पार पडले.

        कार्यक्रमाची सुरुवात 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 06.30 ते 08.00 वाजेपर्यंत आयोजित “रन फॉर युनिटी” या धावस्पर्धेने झाली. या स्पर्धेत बटालियनच्या विविध ठिकाणी कार्यरत 100 हून अधिक अधिकारी व जवानांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित अधिकारी व जवानांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.

           या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रदीप कुमार त्रिपाठी, द्वितीय कमान अधिकारी (113 बटालियन) यांनी सर्वांना राष्ट्रीय एकता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी म्हटले की –

> “कोणत्याही राष्ट्राची खरी ताकद तिच्या नागरिकांमधील बंधुभाव, सलोखा आणि ऐक्यात असते. भारतासारख्या विशाल देशात विविध धर्म, भाषा व संस्कृतीचे लोक एकत्र राहतात, हीच आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आणि वैशिष्ट्य आहे.”

        त्यांनी सर्व अधिकारी व जवानांना राष्ट्राच्या एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी सदैव समर्पित राहण्याचे आवाहन केले तसेच राष्ट्रीय एकतेचा संदेश सर्व देशवासीयांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

         कार्यक्रमादरम्यान अशोक नारायण सिंह (सी.एम.ओ. एस.जी.), राम किशन (उप कमांडंट), गुलाब सिंह (उप कमांडंट) यांच्यासह इतर अधिकारी व जवान उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आली.