Home देशविदेश आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबत सर्वसमावेशक व समतोल विचार व्हावा :- डॉ.हुलगेश चलवादी..‌. —...

आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबत सर्वसमावेशक व समतोल विचार व्हावा :- डॉ.हुलगेश चलवादी..‌. — उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन…

दिक्षा कऱ्हाडे

 वृत्त संपादिका

         महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत सध्या सामाजिक व राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.या पार्श्वभूमीवर,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे सर्वेसर्वा तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाची समतोल भूमिका स्पष्ट केली आहे.आरक्षणाचा लाभ समाजातील शेवटच्या आणि अत्यंत वंचित घटकांपर्यंत पोहोचावा.मात्र उपवर्गीकरणामुळे दलित समाजात फूट पडेल; ही भीती दूर करण्याची गरज आहे.यासोबतच बौद्ध समाजावर अन्याय होणार नाही; याची काळजी सरकारने घ्यावी, अशी भूमिका पक्षाची असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी म्हणाले.

          राज्यात अनुसूचित जातीमध्ये एकूण ५९ जातींचा समावेश आहे.आजवरच्या प्रवासात काही जातींना आरक्षणाचा चांगला फायदा झाला आहे,तर ज्या जातींमध्ये शिक्षणाचे प्रमाण अजूनही कमी आहे,त्या आरक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून काहीशा दूर राहिल्या आहेत.याच वस्तुस्थितीमुळे मातंग समाजाकडून उपवर्गीकरणाची मागणी सातत्याने केली जात आहे.मात्र,ही मागणी पूर्ण करताना आंबेडकरी अनुयायांची आणि प्रामुख्याने बौद्ध समाजाची भावनाही समजून घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.

        बौद्ध समाजाने गेल्या काही दशकांत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे.शिक्षण आणि जागृतीमुळेच हा समाज पुढे जाऊ शकला.त्यामुळे उपवर्गीकरणाचा कोणताही निर्णय घेताना या प्रगत घटकांवर कोणताही अन्याय होता कामा नये,ही आमची आग्रहाची भूमिका आहे.आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी इतर समाज बांधवांनीही शिक्षणामध्ये गतीने प्रगती करणे आवश्यक आहे,कारण शिक्षण हाच प्रगतीचा खरा पाया आहे,असे डॉ.चलवादी म्हणाले.

        आपण सर्व अनुसूचित जाती म्हणून आधी एकत्र आले पाहिजे.एकजूट हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे.आपल्यात कितीही मतप्रवाह किंवा विचार असले,तरी आपण सर्वांनी एकत्र बसून,सखोल चर्चा करून आणि तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन घेऊनच यावर एकमताने सुवर्णमध्य आणि योग्य तो तोडगा काढला पाहिजे.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून हक्क मिळवून दिले आहेत,त्यामुळे कोणताही निर्णय घेताना समाजातील शेवटच्या,अत्यंत मागास घटकाला न्याय मिळालाच पाहिजे; पण तो न्याय मिळवताना संपूर्ण समाज सोबत असला पाहिजे.आम्ही या संदर्भातील अधिकृत जनगणनेची वाट पाहू,वस्तुस्थिती समजून घेऊ आणि सलोख्याने चर्चा करूनच पुढचा मार्ग ठरवू; पण कोणत्याही परिस्थितीत समाजात फूट पडू देणार नाही,हाच आपला ठाम निर्धार असला पाहिजे,अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदाभ आठवले यांची असल्याचे चलवादी म्हणाले.

       उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने घाईघाईने कोणताही निर्णय न घेता समाजातील सर्व घटकांच्या,विविध संघटनांच्या आणि तज्ज्ञांच्या सूचनांचा व भावनांचा सखोल विचार करावा.कोणत्याही घटकावर अन्याय न करता,सर्वसमावेशक आणि समतोल मार्ग कसा काढता येईल,यावर सरकारने गांभीर्याने विचार करावा,असे आवाहन डॉ.हुलगेश चलवादी यांनी केले आहे.सर्व समाज घटकांमध्ये परस्पर सलोखा,बंधुभाव राखून सर्वांना विकासाची समान संधी मिळवून देणे, हाच आरपीआयचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले.