Home Maharashtra अवैध दारु विक्रीबाबत भिसी पोलिस स्टेशनला निवेदन देणे हे उशिरा सुचलेले शहाणपण,”की,ग्रामपंचायत...

अवैध दारु विक्रीबाबत भिसी पोलिस स्टेशनला निवेदन देणे हे उशिरा सुचलेले शहाणपण,”की,ग्रामपंचायत निवडणूकीचे योजनाबध्द नियोजन….

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादीका 

         चिमूर तालुक्यात जिकडे तिकडे अनेक अवैध व्यवसायांचे जाळे पसरले आहे,सदर अवैध व्यवसाय सुरक्षितपणे सुरु आहेत,यावर भाष्य होतांना दिसत नाही.

         तद्वतच चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील स्थानिक जांभुळघाट मध्ये व जांभुळघाट बिटातंर्गत अवैध दारुचा सुरु असलेला व्यवसाय हा पुराना आहे.हा व्यवसाय बंद करण्याचा वारंवार झालेला प्रयत्न आतापर्यंत अयशस्वी ठरलेला आहे.

           तद्वतच अवैध दारु व्यवसायाच्या बातम्या प्रकाशित झाल्या तर भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांच्या व जांभुळघाट बिट जमादारांच्या नजरा मोजक्या दारु व्यवसायीकांवर गेल्यात.जसे काही तेच दारुचा अवैध व्यवसाय करतात आणि दुसरे कुणीही अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करीत नाही.

          काही,अवैध दारु विक्रेत्यांना टार्गेट करतांना व त्यांच्यावर कारवाई करताना होणारा भेदभाव,अनेक दारु विक्रेत्यांना सुरक्षा देणारा आणि प्रोत्साहन करणारा ठरला असल्यामुळे जांभुळघाट बाजार चौकात,जांभुळघाट बसस्थानक परिसरात बिनधास्त अवैध दारु विक्री सुरु होती व अजूनही आहे असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.

           मात्र साडेचार वर्षातंर्गत जांभुळघाट बाजार चौकात प्रत्यक्ष दुकान थाटून देशी व मोहफुलाची दारु बिनधास्त विकल्या जात होती.तेव्हा अवैध दारुचे दुकान हटविण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही किंवा भिसी पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांना आजपर्यंत अवैध दारु विक्री बंद करण्याबाबत निवेदन देण्याचे औचित्य सुध्दा कोणीही पार पाडले नाही किंवा धाडस केले नाही.

          आता तर कमालच झाली,जांभुळघाट ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेंद्र साठोणे यांनी भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन देवून रस्त्यावर विकणाऱ्या देशी दारूची विक्री व गावठी मोहफुलाच्या दारुची विक्री बंद करण्याची मागणी केली.

        राजेंद्र साठोणे यांचा उपसरपंच पदाचा साडेचार वर्षाचा कार्यकाळ झालेला असताना त्यांना बाजार चौकातील देशी दारुच्या व गावठी दारूच्या विक्रीचे अवैध दुकान आणि जांभुळघाट बसस्थानकावरील अवैध दारु विक्री आजपर्यंत का म्हणून दिसली नाही? याबाबत जांभुळघाट येथील नागरिक बुचकळ्यात पडले आहेत.

            दिनांक ३०/०७/२०२५,च्या दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या जिल्हा पान बातमी वरुन कळले की त्यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी अवैध दारुची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली व या तक्रारीत गावातील शांतता भंग होत असल्याचे नमूद केले.याचबरोबर,तरुणाई व शाळकरी विद्यार्थी व्यसनाधीन व्यवस्थेच्या गर्तेत ओढले जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे असेही दैनिक लोकमतच्या वृत्तान्तावरुन दिसून येते आहे.

           अवैध दारु विक्रीमुळे समाजात गैरप्रकार वाढला असून भांडणे होत असल्याचे दैनिक लोकमतच्या बातमीत नमूद आहे.तसेच अवैध दारु विक्रीचा घातक परिणाम लहान मुलांवर होत असल्याचेही दैनिक लोकमतने उपसरपंच राजेंद्र साठोणे यांच्या निवेदनानुसार पुढे आणले आहे.

       अवैध दारु विक्री मुळे स्थानिक नागरिकांवर विविध प्रकारचे परिणाम पाडणारे दैनिक लोकमतचे वृत्त सत्य आहे.पण,त्यांनी भयंकर उशिरा बातमी प्रकाशित केली याचे दुःख जांभुळघाट येथील नागरिकांना आहे.

          जांभुळघाट येथील नागरिकांनी अवैध दारु विक्री संबंधाने आजपर्यंत अजिबात आवाज उठविला नाही किंवा त्यांच्या कार्यकाळात उपसरपंच राजेंद्र साठोणे यांनी स्थानिक लोकसेवक या नात्याने स्वतःहून आजपर्यंत अवैध दारु विक्री संबंधाने भिसी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असल्याची माहिती नाही.

          यामुळे त्यांनी अवैध दारु विक्री संबंधाने भिसी पोलिस स्टेशनला निवेदन देणे,हे त्यांना उशिरा सुचलेले योग्य शहाणपण आहे की,जांभुळघाट ग्रामपंचायत निवडणूकीचे नियोजन आहे याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांत आता उमटू लागल्या आहेत…