ब्रम्हपुरी जिल्हा निर्मीतीच्या आक्रोश मोर्चा व चक्का जामआंदोलनाला भाकप आयटक व किसान सभेचा जाहीर पाठींबा.. — ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिति च्या प्रत्येक आंदोलनात ताकदीने कार्यकर्ते मैदानात उतरणार.:-कॉ.झोडगे 

ऋषी सहारे

संपादक

 ब्रम्हपुरी :- चंद्रपूर जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे मोठे व जिल्हा मुख्यालयापासून 125 की.मी.अंतरावर असलेल्या ब्रम्हपुरी ला जिल्हा घोषित करण्यात यावे यासाठी ब्रम्हपुरीकर 1982 या वर्षांपासून मागणी करीत आहेत. मात्र राज्य शासनाने सदर मागणीकडे सातत्याने मग ते सरकार कुणाचेही असो कानाडोळा केल्याने शासनाला जाग आणण्याकरीता ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समीतीच्या वतीने पुनःश्च क्रांतीची मशाल पेटवल्या गेली असुन दि. 2 जुन 2023 रोजी आयोजित आक्रोश मोर्चा ,चक्का जाम आंदोलनास व त्यापुढे होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात ताकदीने कार्यकर्ते सहभागी करून घेण्याचा व ही मागणी रेटून धरण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक कामगार संघटना व महाराष्ट्र राज्य किसान सभा शाखा ब्रम्हपुरी च्या वतीने घेण्यात आला आहे.

         याबाबत किसान कामगार नेते कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागात गावोगावी बॅनर ,पोस्टर लावत पत्रक वाटप करून तर काही गावी बैठका लाऊन प्रचार यंत्रणेत जोमात कार्यकर्ते कामाला लागले आहे. 

    ब्रम्हपूरी हे ठिकाण चंद्रपूर जिल्हा मुख्यालयापासुन सुमारे 125 किमी अंतरावर असुन नागरिकांना जिल्हा मुख्यालयी विविध शासकीय कामांसाठी, जिल्हा न्यायालय अंतर्गत वाद, शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी सतत होणाऱ्या पायपीटीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासातुन प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागतो. तर वारंवार प्रवासामुळे जनसामान्य नागरिकांना आर्थिक फटका सुध्दा सहन करावा लागतो. नागरिकांची सतत होणारी परवड थांबविण्यासाठी ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीने आपल्या वारंवार रास्त मागणीतुन शासनस्तरावर सलग पाठपुरावा करीत ब्रहपुरी जिल्हा निर्मीतीसाठी आग्रही मागणी धरली आहे. मात्र विद्यमान शिंदे-फडणवीसच्या तसेच त्यापूर्वी असलेल्या काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकाने ब्रम्हपुरी करांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केवळ “आम्ही निवडून आल्यास किंवा सत्तेत आल्यास जिल्हा बनविल्याशिवाय राहणार नाही आणि जिल्हा झाला नाही तर मतं मागणार नाही” अश्या बतावण्या इथल्या लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत आल्या, पण सरकारकडुन अद्यापही कुठलीच हालचाल न झाल्याने ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीने रास्त मागणीकडे कानाडोळा करणाऱ्या राज्यशासनाला जाग आणण्याच्या हेतुने पुनच्छ एकदा ब्रम्हपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समीतीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असून ही मागणी सातत्याने रेटून धरण्यात येणार आहे.

      यासंदर्भात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.विनोद झोडगे, आयटक चे कार्याधक्ष कॉ.प्रदीप चीताडे,किसान सभेचे पत्रुजी मेश्राम,तुकाराम राऊत,संजय लोणारे, बोळदा येथील सरपंच मनीषा झोडगे,माझी सरपंच शरद ठाकरे, सदक्ष उसन ठाकरे, आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना तालुका सचिव जोत्सणा ठोंबरे, वर्षा घुमे गीता कोटगले,वनिता तिवाडे शालेय पोषण आहार युनियनचे सचिव कॉ.कुंदा कोहपरे,जयघोष दिघोरे, अंगणवाडी युनियनचे कॉ.रवींद्र उमाटे,राजू गैनवार जबरान जोतधाराक संघटनेचे रामदास कांबळी,यशवंत बदन,राघोबा इटनकर,बाळकृष्ण दुमाने बांधकाम कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष कॉ.श्रीधर वाढई,विनोद राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी मोर्चाच्या तयारीला जोरात कामाला लागले आहेत.