रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक १ साठी विकासाचा मसुदा जाहीर केला असून,नागरिकांच्या अपेक्षांना प्राधान्य देत मुलभूत सुविधा,स्वच्छता,हरित पर्यावरण,शिक्षण,महिला सक्षमीकरण आणि पारदर्शक प्रशासन यांचा एकात्मिक आराखडा यात मांडण्यात आला आहे.
दरम्यान प्रभाग क्रमाक – १ मधील उमेदवार चुन्नीलाल कुडवे, स्मिता राऊत व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे.
प्रभाग क्रमांक १ मधून गट-अ चे काँग्रेस उमेदवार चुन्नीलाल महादेव कुडवे (पत्रकार) आणि गट-ब मधून स्मिता राकेश राऊत (काळमेघ) तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सारीका मनिष नंदेश्वर हे जनतेचा कौल मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
जाहीरनाम्यात खालील प्रमुख मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे – मुलभूत सुविधांमध्ये क्रांती
प्रभागातील प्रत्येक गल्लीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ते,जलवाहिनी व ड्रेनेजची मजबूत व्यवस्था निर्माण करण्याच्या योजना या जाहीरनाम्यात समाविष्ट आहेत.
तसेच पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा,पुरेशा स्ट्रीटलाईट्स,आणि प्रभावी कचरा व्यवस्थापन प्रणाली निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
हरित व स्वच्छ प्रभागाचा संकल्प – पर्यावरणाशी सुसंगत विकास साधण्यासाठी काँग्रेस उमेदवारांनी प्रत्येक वॉर्डात लहान उद्याने आणि ओपन एअर जिम उभारण्याची घोषणा केली आहे.“आपला वॉर्ड – हरित वॉर्ड” या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण मोहिमा आणि प्लास्टिक मुक्त प्रभाग साकारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
शिक्षण,युवा व क्रीडा प्रोत्साहन – प्रभागातील सरकारी व स्थानिक शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, ग्रंथालय सुविधा यांची उभारणी केली जाईल.
युवकांसाठी करिअर मार्गदर्शन,कौशल्य विकास,तसेच खेळाच्या मैदानांचा विकास व क्रीडा साहित्य पुरवठा यावर ठोस कार्ययोजना राबविण्याचे आश्वासन दिले आहे.
महिला व ज्येष्ठ सक्षमीकरण- महिला बचतगटांसाठी व्यवसायिक प्रशिक्षण,बाजारपेठेची सोय व आर्थिक मदत,तर ज्येष्ठांसाठी विश्रांती केंद्र व आरोग्य तपासणी शिबिरे यांचा समावेश करण्यात आला आहे.
विधवा,अपंग,वृद्धांना शासनाच्या विविध योजनांचा घरपोच लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
गोरगरीबांसाठी गृहनिर्माण व सामाजिक न्याय – प्रभागातील पात्र नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजना मिळवून देण्यासाठी विशेष मदत केंद्र सुरू करण्याची घोषणा उमेदवारांनी केली.राशन,पेन्शन,आरोग्य-विमा योजनांची माहिती व अंमलबजावणीसाठी सल्ला व सहकार्य केंद्र उभारण्यात येणार आहे.
डिजिटल व लोकसहभागी प्रशासन – प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रभाग स्तरावर ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली सुरू केली जाईल.तसेच प्रभाग विकास समिती स्थापन करून प्रत्येक कामात नागरिकांचा थेट सहभाग राहील,असे उमेदवारांनी सांगितले.
जनतेचा शब्द – जनतेसाठीच खर्च – या जाहीरनाम्याच्या घोषणेवेळी उमेदवारांनी सांगितले की,
> “राजकारण नव्हे – विकासकारण!….
प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि प्रत्येक नागरिकाचा सन्मान — हीच आमची बांधिलकी.” काँग्रेस उमेदवारांकडून जाहीर झालेल्या या ठोस आणि लोकाभिमुख धोरणामुळे प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून,काँग्रेसला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे.



