रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा उरक वाढत असताना काँग्रेसने अभ्यंकर मैदानावर शक्तिप्रदर्शन केले. या सभेत माजी विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपावर थेट हल्ला चढवत संविधान धोक्यात असल्याचा आरोप केला. “संविधान आहे म्हणून बहुजनांच्या दारी नेता जातो; तेच संविधान भाजप संपवू पाहते,” अशा शब्दांत त्यांनी प्रहार केला.
यावेळी वाडेट्टीवार यांनी महत्त्वाचे आश्वासन देत म्हटले की, काँग्रेसची सत्ता चिमूर नगर परिषदेत आल्यास शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा नगर परिषदेत घेऊन त्या कॉन्व्हेंट धर्तीवर इंग्रजी माध्यमातून सुरू केल्या जातील. गरीब, सर्वसामान्यांची मुले गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहू नयेत हा या निर्णयामागचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभेत आमदार अभिजित वंजारी, जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनराज मुंगले, प्रा.राम राऊत, गजानन बुटके, माधवजी बिरजे विजय गावंडे, जुनेद खान अविनाश अगडे,विवेक कापसे, मनिष नंदेश्वर,सुधीर पंदीलवार, रत्नाकर विटाळे, बंबू खान नागेश चट्टे राजू चौधरी, यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सारिका नणंदेश्वर व सर्व प्रभागांतील उमेदवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना वाडेट्टीवार म्हणाले,
“चिमूर शहरातील आरोग्यसेवा असो वा पाणीपुरवठा—अनेक महत्त्वाच्या योजना माझ्या काळात मार्गी लागल्या. बहुजनांनी पुन्हा गुलामगिरीत जायचे नसेल तर काँग्रेसला विजयश्री द्या.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गावंडे यांनी तर संचालन विवेक कापसे यांनी केले. अभ्यंकर मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित मतदारांच्या गर्जनांनी काँग्रेसच्या सभेला उत्साहाची उंची मिळाल्याचे चित्र दिसत होते.



