बिग ब्रेकिंग… पोलिस शिपाई युवतीची वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या..

प्रितम जनबंधु

   संपादक 

आरमोरी :- गडचिरोली ते नागपुर मार्गावरील आरमोरी शहरानजीक वाहणाऱ्या वैनगंगा नदी पात्रात पोलिस शिपाई असलेल्या एका युवतीने उडी घेतल्याची घटना आज दुपारी ४ ते ५ वाजताच्या सुमारास घडली. 

      प्राप्त माहितीनुसार शारदा नामदेव खोब्रागडे वय ३० वर्ष असे शिपाई युवतीचे नाव असून, सदर युवती भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील पोलिस ठाण्यात कार्यरत होती. आज दुपारी शारदा खोब्रागडे स्कूटीने पुलावर गेली. तेथे स्कूटी आणि मोबाईल ठेवून तिने थेट नदीपात्रात उडी घेतली. सदर मार्गावरून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी घटनेची माहिती आरमोरी पोलीसांना दिल्यानंतर पोलिसांनी नदीकडे धाव घेतली. आरमोरी पोलिसाची चमु आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी संध्याकाळपर्यंत नदीपात्रात शोधमोहीम राबवली. रात्रो ९ :३० ते १०:०० वाजताच्या सुमारास सदर युवतीचे शव शोधण्यात यश आले असुन शव उत्तरीय तपासणीसाठी आरोग्य उपकेंद्र आरमोरी येथे पाठविण्यात आले आहे.

     दोन दिवसांपूर्वी गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शारदा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात होती. अविवाहित असलेली शारदा ही मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील रहिवासी होती. लाहेरी पोलिस ठाण्यात कार्यरत असली तरी ती मागील काही दिवसांपासून रजेवर होती आणि गडचिरोली येथील एका नातेवाईकाकडे वास्तव्य करीत होती. सदर नातेवाईक यांची स्कूटी घेऊन वैनगंगा नदीवर गेली होती, अशी माहिती आहे. पण सदर युवतीने आत्महत्या का केली असावी याचे कारण अजुनही गुलदस्त्यातच आहे. पुढील तपास आरमोरी पोलिस करीत आहेत.