शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीपद्धतीकडे वळवण्यासाठी आणि त्यांच्या शेतीतील उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी चिमूर तालुक्यातील कोलारा-सातारा येथील घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्र आणि सलाम किसान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक अभिनव पाऊल उचलण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण सेवा घनश्यामजी संशोधन केंद्र कोल्हारा – सातारा येथे सुरू करण्यात आले आहे.
या सेवेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीची अचूक माहिती मिळेल,ज्यामुळे रासायनिक खते व कीटकनाशकांचा अनावश्यक वापर टाळता येईल.
माती परीक्षणाचे अहवाल पाहून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी योग्य पीक निवडण्यास मदत होणार आहे,ज्यामुळे उत्पादनात वाढ होऊन आर्थिक फायदा मिळणार आहे.
यावेळी बोलताना घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्राचे मुख्य प्रवर्तक प्रा.डॉ. अजय घ.पिसे म्हणाले,“वैज्ञानिक शेती ही काळाची गरज आहे.
मातीचे परीक्षण केल्यास शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो आणि त्यांच्या शेतासाठी कोणते पीक फायदेशीर आहे हे ठरवता येते.”
ही सेवा आता स्थानिक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असून,शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी विशेष शिबिरे व प्रात्यक्षिक सत्रे घेण्यात येणार आहेत.
मृदा परीक्षणासाठी शेतातील माती जमा करण्याची शास्त्रोक्त पद्धत असते.शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील चारही बाजूची आणि मध्य भागातील माती ‘V’ आकारात खोदून माती एकत्र करून कोलारा-सातारा येथील कृषी संशोधन केंद्रात आणून द्यावी.
अवघ्या तीन दिवसात मृदा परीक्षणाची संपूर्ण तपशील व पिकांबद्दल मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात येईल.
हा उपक्रम आपल्या परिसरातील शेती पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल घडवेल आणि एक पर्यावरणपूरक,खर्चिकदृष्ट्या लाभदायक व उत्पादनक्षम शेती व्यवस्था निर्माण करेल,अशी अपेक्षा ‘सलाम किसान संस्थेचे’ विदर्भ प्रमुख श्री.सुमित मुंगले यांनी व्यक्त केली.
याबद्दल अधिक माहितीसाठी घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्राचे मुख्य व्यवस्थापक श्री.विलास दिघोरे,विशाल इंदोरकर,मुकेश मसराम,योगेश सोनकुसरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉक्टर अजय पिसे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना केले आहे.



