देवाच्या आळंदीत ज्येष्ठ नागरिकाचा अपघातात मृत्यू….

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

आळंदी : येथील वडगाव रोडवर भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरची एका दुचाकीला धडक बसून यामध्ये दुचाकीवरल मागे बसलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर दुचाकी चालक यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि.२८ मे) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास वडगाव रोड, आळंदी देवाची येथे घडली.

       तात्याभाऊ रावसाहेब धोत्रे (वय ७६, स.रा.आळंदी) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. परमेश्वर बाळासाहेब धोत्रे (वय ५३, स. रा.आळंदी) हे अपघातात जखमी झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोपान लक्ष्मण काळे (वय ५९, रा. कोयाळी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या ताब्यातील डंपर वडगाव घेनंद बाजूकडून आळंदी येथील वडगाव चौकाकडे भरधाव वेगात घेऊन जात होता. तो अचानक अन्नपूर्णा मातानगरकडे जाणाऱ्या रस्त्याला वळाला. त्यावेळी डंपरची फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरात धडक बसली.

      यामध्ये फिर्यादी यांच्या दुचाकीवरील मागे बसलेले ज्येष्ठ नागरिक तात्याभाऊ हे रस्त्यावर पडले. त्यांच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर फिर्यादी यांच्या पायाला मार लागला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.