दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – आळंदी शहरात स्वच्छता राखण्यासाठी आळंदी नगरपरिषद प्रशासनाने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना दुजोरा देत, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकावर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नगरपरिषदेने गेल्या आठ दिवसांपासून शहरात विविध माध्यमांतून “उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई” असा संदेश देत जनजागृती केली होती. तरीही काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्यावर स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शासन निर्णयानुसार ₹५००/- दंड आकारण्यात आला आहे.
नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, “शहराच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून अशा प्रकारचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. नियम तोडणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल.”
नगरपरिषदेने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, कचरा निश्चित ठिकाणीच टाकावा आणि प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहकार्य करावे. यासोबतच नागरिकांच्या सोयीसाठी घंटागाडी सेवा वेळेवर मिळावी यासाठी संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.
शहर स्वच्छतेसाठी ही एक सकारात्मक पावले असून, नागरिकांनी सहकार्य करून “स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी” साकार करण्यास हातभार लावावा, असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.



