दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त श्रीगुरु योगी निरंजननाथ यांना अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे यंदाचा “धार्मिक भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती ॲड. निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फळांची करंडी, महावस्त्र आणि श्रीफळ असे होते.
हा सन्मान सोहळा पुण्यातील मंडईतील बुरूड आळी येथे पार पडलेल्या अखिल म्हसोबा उत्सवात देण्यात आला. या वेळी आमदार विजय शिवतारे, आमदार हेमंत रासने, लेखक शरद तांदळे, माजी नगरसेवक गणेश बीडकर, तसेच ट्रस्टचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योगी निरंजननाथ यांची कार्याची ओळख…
योगी निरंजननाथ हे नाथ संप्रदायाचे अनुयायी असून त्यांनी शांतीनाथ महाराजांकडून दीक्षा घेतली आहे. नाथ संप्रदाय ही एक शैव परंपरा आहे ज्यात गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
त्यांनी आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त म्हणून कार्यरत आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोसळाप्रमुख म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. ते वारकरी संप्रदायाशीही दृढपणे संबंधित आहेत. मंदिर व्यवस्थापन, सेवाकार्य, आणि धार्मिक उत्सवांच्या आयोजनात त्यांचा मोलाचा सहभाग असतो.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या धर्मप्रेमींना “धार्मिक भूषण पुरस्कार” देऊन गौरवण्यात येते. यंदा योगी निरंजननाथ यांच्या धार्मिक कार्य, वारकरी चळवळीतील योगदान, आणि सामाजिक भान जोपासणाऱ्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा सन्मान देण्यात आला.



