राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली व्दारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील गांधी अध्ययन केंद्र व गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हिंद स्वराज्य ,राष्ट्रपिता बापू, मोहन ते महात्मा या गांधीजींच्या जीवन कार्यावरील पुस्तकांवर आधारित गांधी विचार व संस्कार परीक्षा घेण्यात आली होती.
यात विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयाचे दर्शन युवराज राऊत व मुनघाटे महाविद्यालयाची वनश्री रमेश पत्रे हे विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्यातुन द्वितीय आलेले आहेत. तर कु.नीलम शालिकराम हलामी ही विद्यार्थीनी जिल्ह्यातून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक महोत्सवात सदर विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारकार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा , गांधीजींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे ,विद्यार्थ्यांना गांधीचे तत्वज्ञान व जीवनपटाची माहिती व्हावी याकरिता सदर परीक्षेचे आयोजन जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्यावतीने सातत्याने दरवर्षीच घेण्यात येत असते. दंडकारण्य ही संस्था गांधीजींच्या विचाराची पाईक आहे. यापूर्वीही मा. चंद्रकांत वानखेडे यांचे “गांधी का मरत नाही?” यावरील व्याख्यान तसेच सुप्रसिद्ध पत्रकार तथा विचारवंत सुरेश द्वादेशीवार यांचे गांधी समजून घेताना, मा.भुजंगराव बोबडे यांचे गांधीजी वरील व्याख्यान असे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जीवन कार्यावरील कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आलेले होते.
सदर कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये उपप्राचार्य डॉ. अभय साळुंके,उपप्राचार्य किशोर खोपे, महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे समन्वयक डॉ.रवींद्र विखार, सहकारी डॉ. गणेश सातपुते, प्रा.शैलेश हडप, प्रा.सुभाष धोंगडे, प्रा. तिरुपती बोरकर यांनी मोलाचे सहकार्य केले.



