पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू…. — चंद्रपुरातील इरई नदीघाटावरील घटना….

प्रितम जनबंधु

  संपादक 

चंद्रपूर :– मित्रासोबत नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा इरई नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. साहिल प्रवीण घुमे वय १४ वर्ष, रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड असे त्या मृत मुलाचे नाव आहे.

               विशेष म्हणजे मंगळवारी दुपारी त्या मुलाचा शालेयस्तरीय कबड्डी सामना होता. परंतु त्यापूर्वीच त्याचे दु:खद निधन झाले. मंगळवारी सकाळी साहिल आपल्या तीन मित्रांसह विठ्ठल मंदिर परिसरातून वाहणाऱ्या इरई नदी येथे पोहण्यासाठी गेला होता. पोहताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. ही बाब त्यांच्या मित्रांना समजताच त्यांनी आरडाओरड केली व परिसरातील नागरिकांना बोलावले. मात्र, तोपर्यंत साहिल आढळून आला नाही. 

            याबाबतची माहिती लगेच शहर पोलिसांना देण्यात आली. दरम्यान शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीशसिंग राजपूत यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठले. पाणबुड्याच्या साह्याने त्याची शोधमोहीम राबवली. यावेळी जवळच त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे विठ्ठल मंदिर व्यायाम शाळा व परिसरात शोककळा पसरली आहे.

           पुढील तपास चंद्रपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीशसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शन सुरू आहे.

            साहिल हा कबड्डीसह कुस्तीसुद्धा खेळायचा. तो विठ्ठल व्यायम शाळेत कुस्तीचे धडे गिरवत होता. नुकतीच त्याने विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे त्यांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड झाली होती. मात्र, त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.