जनविरोधी भाजप सरकार विरोधात लहान पक्ष एकत्र… — गडचिरोलीत प्रागतिक पक्षांची आघाडी…

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने त्यांच्या सत्ताकाळात ओबीसी,दलीत, आदिवासींच्या हक्क आणि अधिकारांवर गदा आणण्याचे जनविरोधी काम केले आहे. धार्मिक,जातीय अजेंडा राबवत भांडवलदारांच्या फायद्यासाठी सामान्य जनतेला बरबाद करण्याचे काम केले असून देशाचे संविधान आणि लोकहिताचे कायदे बदलविणाऱ्या भाजप सरकार विरोधात येत्या लोकसभा – विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काम करण्यासाठी राज्यातील तेरा डावे, पुरोगामी, आंबेडकरवादी राजकीय पक्ष एकत्र येवून प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र नावाने आघाडी तयार करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यातही ही आघाडी जोमाने काम करणार आहे.

                शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर), बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा (माले) लिबरेशन पार्टी, रिपाई (सेक्युलर) पार्टी व श्रमिक मुक्ती दल हे तेरा घटक पक्ष प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र या आघाडीत सहभागी आहेत. स्थानिक स्तरावर अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी युवा विकास परिषद, खदानविरोधी ग्रामसभा यांनाही या आघाडीत सहभागी करून घेण्यात आले असून भाजप सरकार विरोधात जनमत एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

            गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण, युवकांची बेरोजगारी, महगाई, सिंचन व्यवस्थेची व शिक्षणाची दुरावस्था, विकास कामांतील भ्रष्टाचार, रोजगाराच्या नावाने जंगलतोड करुन लोह खनिजांची होत असलेली लुट, जातीय व धार्मिकता, दलीत, आदिवासींवरील वाढते अत्याचार आणि विद्यापीठातील भाजप – संघ पुरस्कृत बहुजन विरोधी षडयंत्रा विरोधात प्रागतिक पक्षांची आघाडी लवकरच जिल्हाभरात जनजागरण करीत आवाज बुलंद करणार आहे.

             पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, शामसुंदर उराडे, रोहिदास कुमरे जयश्रीताई वेळदा, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव ॲड.जगदिश मेश्राम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इलियास पठाण, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश दुधे, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे,शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, आदिवासी विकास युवा परिषदेचे विनोद मडावी, पुरोगामी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, तितिक्षा डोईजड प्रामुख्याने उपस्थित होते.