दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
मुंबई – श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 288.17 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून, या आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “श्री क्षेत्र भीमाशंकर हे धार्मिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक भेट देतात. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी दर्जेदार सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. या ठिकाणी इको टुरिझमच्या संकल्पनेवर आधारित विकास करावा.”
विकास आराखड्याची वैशिष्ट्ये…
१)इको टुरिझम: नैसर्गिक सृष्टीसौंदर्याचा विचार करून वनभ्रमण पथांची निर्मिती.
२)रोप वे: भाविकांसाठी सोयीसाठी रोप वे सुविधा विकसित करणे.
३)निगडाळे येथे पर्यटन केंद्र: हॉटेल, रेस्टॉरंट आणि निवास व्यवस्था.
४)वाहतूक व दळणवळण सुधारणा: अंतर्गत रस्ते, राजगुरुनगर-तळेघाट-भीमाशंकर महामार्गाचा विकास.
५)हेलीपॅड व वीज उपकेंद्र: आकस्मिक गरज आणि अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी.
६)सुरक्षा व्यवस्था: गर्दी लक्षात घेता अतिरिक्त पोलिस चौकी स्थापन करणे.
७)स्थानिकांचा सहभाग: स्थानिक व्यावसायिक व दुकानदारांसाठी नवे व्यवसाय संधी.
या बैठकीस सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आ.दिलीप वळसे पाटील, आ. बाबाजी काळे, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तसेच विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी विकास आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले.
मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले. 2027 च्या कुंभमेळ्यास पूर्वी श्री क्षेत्र भीमाशंकर हे एक आधुनिक सुविधा असलेले, पर्यावरणस्नेही धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प या बैठकीत घेण्यात आला.



