दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीतील पालखी सोहळा १९ जून रोजी आळंदीहून प्रस्थान करून २८ जून रोजी फलटण येथे मुक्कामी येणार आहे. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिकेने शहरात आणि पालखी मार्गावर विविध महत्त्वाच्या सुविधा व नियोजनांची अंमलबजावणी केली आहे. याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी निखील मोरे यांनी सविस्तर माहिती दिली.
डांबरीकरण व दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे..
पालखी मार्गावरील रस्त्यांचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. वेळोवेळी झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर निर्माण झालेली अडथळे दूर करत तात्पुरत्या डागडुजीच्या माध्यमातून मार्ग सुरळीत करण्यात आला आहे. तसेच शहरातील व नदीपूलांवरील तुटलेल्या रेलिंग्स तात्काळ दुरुस्त करण्यात आल्या आहेत, जेणेकरून वारकऱ्यांना सुरक्षित मार्ग मिळेल.
स्वच्छता मोहिमेचे युद्धपातळीवर काम…
पालखी मार्गावरील दगड-माती उचलण्याचे आणि संपूर्ण स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी स्वतंत्र कार्यसंघ तयार करण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या २ जेसीबी, २ ट्रॅक्टर आणि ५० कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था…
वारकऱ्यांच्या सोयीसाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये पाणपोई लावण्यात आल्या आहेत. याशिवाय आठ पाण्याचे टँकर एकाचवेळी भरता येतील असे केंद्र उभारण्यात आले आहे. या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे.
वाहतूक नियोजन आणि पालखी तळावरील सुधारणा…
पालखीच्या आगमनानिमित्त विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. वारकरी, मालवाहतूक ट्रक आणि अन्य वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग आखण्यात आले आहेत, जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.
पालखी तळावरही अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. मुख्य रस्त्याचे डांबरीकरण झाले असून, साइड पट्ट्यांवर मुरूम टाकण्यात आला आहे. गर्दी नियंत्रणासाठी बॅरिकेडिंग केली गेली असून यावर्षी लाल मातीऐवजी कमी जाडीची कच टाकण्यात येणार आहे.
आरोग्य सेवा आणि सेवा केंद्रांची उभारणी…
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी तात्पुरते हॉस्पिटल व दवाखाने तयार करण्यात आले असून, २० फिजिओथेरपी तज्ज्ञ, डॉक्टर आणि ‘हिरकणी कक्ष’ कार्यरत असतील. महिला व पुरुष वारकऱ्यांसाठी स्वतंत्र स्नानगृहेही उभारण्यात आली आहेत.
राज्य शासनाच्या सहकार्याने पालखी तळाजवळ ‘वारकरी सेवा केंद्र’ उभारण्यात आले आहे. येथे तब्बल १५० डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार असून, आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी ही व्यवस्था मोलाची ठरणार आहे.
कठोर नियंत्रण आणि पोलीस यंत्रणा सज्ज…
गर्दी नियंत्रणासाठी पालखी मार्गावर हातगाड्या व स्टॉल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी नगरपालिकेचे फिरते पथक आणि पोलीस बंदोबस्त सज्ज आहेत. तसेच पालखी मार्गावर विद्युत रोषणाईसाठी ८ सॅटेलाईट पॉईंट आणि जनरेटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. फलटण नगरपरिषद वारकऱ्यांना कोणतीही अडचण जाणवू नये यासाठी कटाक्षाने काम करत असून, प्रशासनाच्या सज्जतेमुळे या वर्षीचा पालखी मुक्काम सुयोग्य आणि व्यवस्थीत पार पडणार, असा विश्वास व्यक्त होत आहे.



