Home Maharashtra AI, स्मार्ट सिटी आणि विकसित भारतातील करिअर संधींवर मार्गदर्शक वेबिनार 

AI, स्मार्ट सिटी आणि विकसित भारतातील करिअर संधींवर मार्गदर्शक वेबिनार 

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

         आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट सिटी संकल्पना आणि विकसित भारताच्या दृष्टीकोनातून निर्माण होणाऱ्या करिअर संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथे “AI, Smart Cities & Career Opportunities in Viksit Bharat” या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम Institution’s Innovation Council आणि Computer Society of India (CSI) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयातील IE हॉलमध्ये प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांच्या मार्गदर्शनात पार पडला.

          या वेबिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जामिया हमदर्द, दिल्लीचे प्राध्यापक डॉ. इहतीराम रझा खान उपस्थित होते. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील झपाट्याने होणारी प्रगती, स्मार्ट सिटी संकल्पनेमागील तांत्रिक अधिष्ठान तसेच ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी आवश्यक कौशल्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपर्यंत शिक्षण मर्यादित न ठेवता, नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत कौशल्ये आत्मसात करून संशोधन, स्टार्टअप्स आणि नवोपक्रम क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

               तसेच डेटा सायन्स, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) आणि स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रांमध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणावर करिअर संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘विकसित भारत’ घडविण्यात तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण विचारसरणी स्वीकारून समाजाभिमुख तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

           या कार्यक्रमास डॉ. नितीन जानवे आणि डॉ.आर.के. कृष्णा यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक Institution’s Innovation Council च्या अध्यक्षा डॉ. अंजुम कुरेशी यांनी केले, तर संचालन महेक कुरेशी यांनी केले.

           संपूर्ण सत्रामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपली जिज्ञासा व्यक्त केली, ज्यामुळे कार्यक्रम अधिक संवादात्मक व ज्ञानवर्धक ठरला.

           कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. माधवी साडू (समन्वयक, CSI), डॉ. प्रविण मत्ते आणि प्रा. सचिन धावस (कार्यक्रम समन्वयक) यांनी विशेष परिश्रम घेतले.