खेडा पद्धतीने शेतमाल खरेदी केल्यास खबरदार!.. — कारवाई करणार :-कृषी उत्पन्न बाजार समिति भद्रावतीचा निर्णय…

     उमेश कांबळे

तालुका प्रतिनिधी भद्रावती

          कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे उपबाजार आवार चंदनखेडा या हद्दीत विनापरवाना व्यापाऱ्यांनी खेडा पद्धतीने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करू नये, अन्यथा असा प्रकार आढळल्यास त्या व्यापा-यांवर कारवाई करण्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकताच झालेल्या बैठकीत घेतलेला आहे. 

         शेतकऱ्यांचे सोयाबीन, धान,तुरी,व चना या मालाचे खरेदी- विक्रीचे व्यवहार उपबाजार आवार,चंदनखेडा येथे लिलाव पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. काही विनापरवाना व्यापारी शेतकऱ्यांना भुलथापा देऊन निघालेला माल खरेदी करण्याचा प्रकार काही भागात सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याकरिता नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समिती ,भद्रावतीचे उपबाजार आवार,चंदनखेडा हद्दीतील व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांची बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती अश्लेषा (भोयर) जीवतोडे व सर्व सदस्य व सचिव नागेश पुनवटकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. 

             उपबाजार आवार ,चंदनखेडा येथे लवकरच शेतमालाचे खरेदी- विक्रीचे व्यवहार लिलाव पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे .खेड्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. त्यात सर्वसामान्य शेतकरी मोठ्या प्रमाणात भरडला जातो. या प्रकाराला आळा बसावा, यासाठी भद्रावती तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती,भद्रावतीचे उपबाजार आवार, चंदनखेडा येथे विक्रीस आणावे, यासाठी व्यापाऱ्यांना सूचना केल्याची माहिती सभापती भास्कर ताजने उपसभापती अश्लेषा (भोयर )जीवतोडे व सचिव नागेश पुनवटकर यांनी दिली आहे.