गणेशोत्सवातून लोकमान्यांचे विचार घराघरात…. –“लोकमान्यांचा लोकनायक”नृत्य नाटीकेची तरुणाईवर छाप…

 

प्रितम जनबंधु

संपादक

      भंडारा :- लोकमान्यांच्या जाज्वल्य विचारांची ज्योत अविरत पेटत राहावी आणि त्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची महती आजच्या युवा पिढीला कळावी या उदात्त हेतूने ”लोकमान्यांचा लोकनायक” या नृत्य नाटिकेचे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी आयोजन केले जात आहे. लोकमान्य यांचेसोबत समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कार्य करणाऱ्या अनेक थोरांची गाथा या निमित्ताने गावागावात पोहोचत आहे.

         खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या वैनगंगा पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने शुभांगी सुनील मेंढे यांच्या कल्पनेतून हे नृत्य नाटिका साकारली गेली. दोन्ही जिल्ह्यातील निवडक अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने त्या-त्या ठिकाणी या नाटिकेचे सादरीकरण केले जात आहे. पारतंत्र्याच्या काळात जन्मलेल्या लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी उभारलेला लढा आणि त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव व शिवाजी महाराज जयंती उत्सवाकडे पाहिले जाते. त्याकाळी लोकांच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण करण्यासाठी आणि हा लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे या अत्यंत प्रेरक हेतूने सुरू झालेल्या गणेशोत्सवाची महती कळावी आणि त्यातून थोर पुरुषांचे विचार युवा पिढीच्या मनापर्यंत पोहोचावे हा एकमेव हेतू या आयोजनामागचा आहे.

         असर फाउंडेशनच्या गुणवंत अशा कलाकारांना सोबत घेऊन साकारलेल्या या नृत्य नाटिकेतून लोकमान्य टिळकांसह राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, अहिल्याबाई होळकर, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरक जीवनकार्याचा आलेख उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

        कलागुणांमध्ये निपुण असलेल्या असरच्या कलावंतांनी साकारलेली पात्र आणि त्या पात्रांना जिवंतपणा आणण्यासाठी त्यात कलेच्या माध्यमातून ओतलेला प्राण आज लोकांच्या कौतुकाचा विषय झाला आहे.

        एरवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दरम्यान होणारे विविध कार्यक्रम केवळ मनोरंजन देऊन जातात, या नृत्य नाटकेतून देशभक्तीचा आणि थोरांच्या विचारांची मोठी शिदोरी युवा पिढीसाठी दिली जात आहे. लोकमान्यांचा लोकनायक आज सार्वजनिक गणेश मंडळाच्या व्यासपीठावरून घराघरात पोहोचत असेल तर खऱ्या अर्थाने लोकमान्यांनी त्यावेळी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रत्यक्षात आणलेले कल्पना सार्थकी ठरते आहे असे म्हणता येईल.