Home देशविदेश विसावे विद्रोही साहित्य संमेलन क्रांतिकारी विचारांचा सांस्कृतिक जागर :- डॉ.अनंत दा.राऊत….

विसावे विद्रोही साहित्य संमेलन क्रांतिकारी विचारांचा सांस्कृतिक जागर :- डॉ.अनंत दा.राऊत….

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

 

      ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहुमता।।’ हे मध्ययुगीन विद्रोही संत कवी तुकोबा यांच्या स्वतंत्र बाण्याच्या अभंगाचे बिरुद मिरवत नांदेडमध्ये विसावे विद्रोही साहित्य संमेलन होत आहे.

         लोकांचा खूप मोठा मतप्रवाह जर धर्मांधतेकडे,जात्यांधतेकडे,सत्ताधाऱ्यांची गुलामी करण्याकडे आणि मूल्यहीनतेकडे वाटचाल करत असेल,तर हा मानवघातकी दिशेने वाहत जाणारा प्रवाह कितीही मोठा असला तरी त्या प्रवाहासोबत आम्ही वहात जाणार नाही.

         आम्ही या प्रवाहाच्या विरोधात पोहणार.म्हणजेच संत तुकोबांच्या बाणेदार भूमिकेप्रमाणेच आम्ही चुकीचे,राष्ट्रघातकी मानवघातकी बहुमत मानणार नाही.हा क्रांतिकारी विचार घेऊन निघालेले हे साहित्य संमेलन आहे. 

           विद्रोही सांस्कृतिक चळवळ आयोजित,स्वातंत्र्य,समता,न्याय, भगिनीबंधुता,मानवता,सत्य,शांती,अहिंसा,सेक्युलॅरिझम,बुद्धिवाद,विज्ञानवाद इत्यादी संविधान मूल्यांना समर्पित असलेले विसावे विद्रोही साहित्य संमेलन परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र असलेल्या नांदेड शहरात २७,२८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ हे तीन दिवस खूप मोठ्या उत्साहात होत आहे.

          वैश्विक मानव्यभावाचा सहज व प्रभावी आविष्कार करणारे मराठीतील सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन होत आहे.

        विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक,जीवनदानी,ध्येयवादी कार्यकर्ते किशोर ढमाले गेल्या दोन महिन्यांपासून हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत.

          स्वागताध्यक्ष म्हणून धुरा सांभाळणारे राहुल प्रधान,स्थानिक संयोजन समितीमधील सर्व पदाधिकारी,विद्रोही सांस्कृतिक चळवळीची राज्य कार्यकारणी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे काम करत आहे.

        या संमेलनातील प्रत्येक उपक्रम हा समतावादी,क्रांतिकारी विचारधारेला वाहिलेला आहे.या संमेलनाचा लोगो म्हणजेच बोधचिन्ह विधायक विद्रोही कृतीचे सूचन करणारे आहे.या लोगोमध्ये विश्वव्यापी निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर एक बलदंड असा मूठ वळवलेला विद्रोही हात सर्व प्रकारचे गुलामीचे साखळदंड तोडताना दिसतो. 

          यातील हाताच्या बलदंड मुठीवर वैश्विक मानवी रक्ताचे,क्रांतीचे व बलिदानाचे प्रतीक असलेला लाल रंगाचा गोळा दिसतो.त्याला सूर्य रुपातही पाहता येऊ शकते.त्याच्यावर सुंदरसे पिंपळपान आहे.पिंपळपान हे भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठतम वारसा असलेल्या करुणामयी, सकलमानवकल्याणकारी बुद्ध संस्कृतीचे प्रतीक आहे.

         प्रगतीच्या आभाळात उंच उंच भरारी घेणारे मुक्त पक्षी आहेत.भारतीय शिल्पकलेचा जगप्रसिद्ध वारसा असलेल्या अजिंठ्याच्या लेण्यातील भव्य शिल्प आहे.

         संमेलनाच्या पूर्वसंध्येला २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८-३० ते ९-३० या वेळेत.’भयंकराच्या दरवाज्यात कोण?’ हा मयूर शितोळे यांनी दिग्दर्शित केलेला नृत्य नाट्याचा प्रयोग होत आहे.

“स्ववर्चस्ववादी व विषमतावादी शोषक प्रवृत्ती संपूर्णपणे नष्ट कराव्यात आणि एक तीळ सात जणांनी करंडून खावा.

            आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून गुण्यागोविंदाने नांदावे.” असा संदेश देणारे मराठीतील विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितेवर हा नृत्यनाट्यप्रयोग आधारलेला आहे. 

        २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८-०० वाजता म.फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून समतावादी विचारांचा जागर करणारी ‘सांस्कृतिक विचार यात्रा’ निघेल.

         नांदेडमधील सायन्स कॉलेजच्या सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल मैदानात उभारलेल्या राजा ढाले साहित्य नगरीत,फुले,शाहू,आंबेडकरी सभा मंडपातील सावित्रीबाई फुले विचार मंचावर विषमतेची उतरंण फोडून दिसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल. 

         बजरंग बिहारी तिवारी हे दिल्ली येथील बहुभाषिक समीक्षक या संमेलनाचे उद्घाटन करतील. 

        उद्घाटन समारंभात महात्मा फुले यांचा सत्याचा अखंड गायला जाईल. पावरीवादन होईल. ‘वंदन मानवाला’ हे वामनदादा कर्डक यांचे गीत व संविधान गीत गायले जाईल.त्याचबरोबर विद्रोही संमेलन गीताचे गायनही होईल.

        उद्घाटक डॉ.बजरंग बिहारी तिवारी यांच्या मार्गदर्शनासोबतच संमेलनाचे अध्यक्ष लोकनार यशवंत यांचे भाषण होईल.उद्घाटन समारंभात मावळते अध्यक्ष डॉ. अशोक राणा व दिल्ली येथील विचारवंत डॉ. मिलिंद आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती राहील.

           विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्षा प्रा.प्रतिमा परदेशी साहित्य संमेलनाची भूमिका मांडतील.या संमेलनात विविध क्षेत्रात मानवोपयोगी कार्य केलेल्या काही ज्येष्ठ महनीय व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. 

         या मान्यवरांमध्ये डॉ.व्यंकटेश काब्दे,डॉ.सुधीर गव्हाणे,के.ई.हरिदास,प्रा.रामप्रसाद‌ तौर,एन.डी.गवळे,प्रा.भगवंत क्षीरसागर,केशरबाई गोटमुखे,गुणवंत डकरे,तानाजी ठोंबरे व अरविंद देशपांडे यांचा समावेश आहे.

         वर्तमानातील धर्मांध व्यक्ती व सत्ताधाऱ्यांकडून देखील इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याच्या काळात ‘इतिहासाचे विकृतीकरण विष्णुशास्त्री चिपळूणकर ते विश्वास पाटील व्हाया ब.मो. पुरंदरे’या विषयावर महत्त्वपूर्ण असा परिसंवाद होईल.’भाषा आणि सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण हिंदी सक्ती आणि अभिजात भाषेच्या निमित्ताने’या विषयावर डॉ. वंदना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. 

         डॉ.रेखा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रसार माध्यमांचा तिढा डिजिटल स्वरूप आणि मूल्यात्मक आव्हाने’ या महत्त्वपूर्ण विषयावर देखील परिसंवाद होईल.

         ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि बहुजनांची हद्दपारी’ हा प्रा.शरद जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणारा परिसंवादही महत्त्वाचे विचारमंथन घडवून आणणार आहे.

        गटचर्चा हा संमेलनातील सर्वांनाच सहभागी करून घेणारा विद्रोही साहित्य संमेलनातील फार महत्त्वाचा भाग असतो. गटचर्चेमध्ये या संमेलनात

जनगणना जातनिहायच,नालंदा ते गगोटीया विद्यापीठ,जल – जंगल – जमीन अधिकाराचा प्रश्न,यूजीसी कायदा : रोहित वेमुला, पायल तडवी आणि नंतर, एआय व तंत्र वैज्ञानिक क्रांतीने उभे केलेले सांस्कृतिक प्रश्न, शेती,शेतकरी आणि ट्रम्प- मोदी करार, भटके विमुक्तांवरील वाढते हिंसाचार, मराठवाड्यातील दुष्काळ, अतिवृष्टी, शेतकरी आत्महत्या आणि विकासाचा प्रश्न, सांविधानिक राष्ट्रवाद हाच खरा राष्ट्रवाद, मुस्लिमांचे जीवन आणि मराठी साहित्य, आदिवासींचे वनवासीकरण कशासाठी? 

        आणि जातीयवादविरोधी चर्चाविश्व नरहर कुरुंदकर, रावसाहेब कसबे आणि शरद पाटील अशा विषयांवरील गटचर्चांमधून गंभीर विचार मंथन होईल. 

         वर्तमानात संविधानविरोधी धर्मांध व भांडवलदारधार्जिन्या शक्ती बलदंड झाल्याच्या पार्श्वभूमीवर होणारे हे संमेलन संविधान मूल्यांचा जागर करण्याला सर्वाधिक महत्त्व देताना दिसते.

या संमेलनात ‘धर्म संस्कृती आणि संविधान’ या विषयावर माजी संमेलन अध्यक्षा डॉ. प्रतिभा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होत आहे.

        ’ब्राह्मणी कार्पोरेट भांडवली राजकारण आणि सांविधानिक लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर पत्रकार राजू परुळेकर यांचे होणारे विशेष व्याख्यान संविधान जागर करणारेच आहे. 

        याशिवाय सदर संमेलनात पहिल्यांदाच डॉ.अनंत राऊत व डॉ.आनंद इंजेगावकर या अध्यक्ष मंडळाच्या नेतृत्वात ‘संविधानवादी कवी संमेलन’ होत आहे. हे कवी संमेलन नव्या पिढीतील कवींना संविधानवादी साहित्य निर्माण करण्याच्या प्रेरणा देईल.

         याशिवाय डॉ.भीमराव हाटकर यांची व क्रांतीकुमार पंडित यांचा संविधान प्रबोधन जलसा, महेश जैन व प्रफुल्ल राठोड यांची संविधान गीतमला संगीत क्षेत्रात संविधानवादी संगीत कलेचे समृद्ध दालन निर्माण करण्याच्या दिशा देणार आहे. 

        या संमेलनातील कलादालनात भरणारे युवा प्रबोधन मंच निर्मिती ‘संविधान संस्कृती चित्र प्रदर्शन’ सांविधानिक चित्रकला विकसित करण्याच्या दिशा देईल.

          या संमेलनात केवळ वैचारिक मेजवानीच असेल असे नाही,तर अनेक पद्धतीचा कला व सांस्कृतिक आविष्कारही या संमेलनातून होणार आहे.

           प्रेमानंद गज्वी यांची दिनेश कवडे व कैलास पपुलवाड यांनी सादर केलेली ‘घोटभर पाणी’ ही एकांकिका, एम. सी.सोशालिस्टचे रॅप संगीत, कथाकथन, डॉ. वृषाली रणधीर यांचा ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ हा एक पात्री प्रयोग, ज्ञानेश महाराज प्रस्तुत लोकआख्यान – शाहिरांचे गणराज्य (लोकशाहीच्या सांस्कृतिक प्रवासाचे संगीत व्याख्यान) मिलिंद शिंदे या सिनेनाट्य अभिनेत्याशी संवाद हा देखील खास आकर्षणाचा विषय आहे.

        लहान मुलांचे कथाकथन, “ती”चा संघर्ष,कागदी क्रांती हा अजिंक्य गायकवाड यांचा एक पात्री प्रयोग.अशी खूप मोठी सकस सांस्कृतिक मेजवानी देखील या संमेलनात मिळणार आहे.

         काव्य पहाट सह जुन्या व नव्या पिढीतील अनेक कवींची कवी संमेलने नवीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा,संवाद सर्जनशील साहित्यिक कलावंतांशी असे महत्त्वपूर्ण कार्यक्रमही या संमेलनात होणार आहेत.

         याशिवाय विसाव्या विद्रोही साहित्य संमेलनात परिवर्तनवादी क्रांतिकारी संदेश देणाऱ्या कितीतरी साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक गोष्टी घडणार आहेत. विसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाला साहित्य व कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीतर्फे करण्यात येत आहे.