आळंदीत पालखी सोहळ्यानिमित्त आरोग्य विभाग सज्ज…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

     आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने आषाढी पायी वारी काळात बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभागात वारकऱ्यांना उपचाराबाबत २४ तास सुविधा दिली जाणार आहे. आळंदी देवस्थान प्रशासन देईल त्या जागेत ईसीजी सुविधांसह एक ऑक्सिजन बेड उपलब्ध ठेवणार आहे.

        पालखी सोहळ्यात विशेष करून महिला भाविकांच्या आरोग्यविषयक समस्या निवारणासाठी स्वतंत्र स्रीरोग वैद्यकीय अधिकारी ठेवणार आहे, असे आळंदी शहर, ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

        आळंदी शहर, ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने आषाढी पायी वारीविषयक आरोग्य सेवेबाबत प्रशासनाने सांगितले की, आळंदी ग्रामीण रुग्णालयात वारीच्या काळात अत्यावश्यक सेवा देण्यासाठी जादाचे जम्बो व लहान ऑक्सिजन सिलेंडर भरलेल्या स्थितीत ठेवले जातील. आळंदी शहरातील अन्य खासगी रुग्णालयातील दहा बेड राखीव ठेवले आहेत. याचबरोबर शहरात भाविकांची संख्या वाढते. अशावेळी प्रत्येकालाच ग्रामीण रुग्णालयापर्यंत येणे शक्य होत नाही.

           याला पर्याय म्हणून भाविकांसाठी नऊ वेगवेगळ्या ठिकाणी औषधोपचारासाठी आरोग्य बूथ आळंदी शहरात उभे केले जाणार आहेत. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाच आयसीयू बेड तयार केले आहेत. याचबरोबर ग्रामीण रुग्णालयात माफक दरात क्ष-किरण मशिन आणि ईसीजी मशिन उपलब्ध असणार आहेत. शहरातील हॉटेलची तपासणी, साठवणूक केलेल्या पाण्याची तपासणी केलेली आहे.

          आषाढी पालखी काळामधे परिस्थिती नियंत्रण राहण्यासाठी आणि दैनंदिन अहवाल सादर करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून डॉ.सुचित्र खेडकर यांची नेमणूक केली आहे. वारीमधे आपत्कालीन परिस्थितीत वेळेत औषधोपचार मिळण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष, साथरोग नियंत्रण कक्षाचे नियोजन केले आहे. यामधे एक वैद्यकीय अधिकारी, एक अधिपरिचारिका आणि चोवीस तास रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहे.